मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी शिक्षकांची तब्बल १३४२ पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरीता शिक्षण विभागाने जाहिरात दिली असून रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंतही ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली तरी गेल्या काही वर्षात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त झाली होती. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती अशा ८ भाषिक माध्यमांच्या शाळा चालवल्या जातात. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे १,१२९ शाळांमध्ये मिळून सध्या ३ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. करोनाकाळानंतर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली आहे. तसेच सीबीएसईच्या शाळा, अन्य बोर्डांच्या शाळा, शैक्षणिक वस्तू वाटप यामुळे विद्यार्थी संख्या वाढली आहे. यामुळे शिक्षण विभागाचे कौतुक होत असले तरी शिक्षकांची कमतरता हा प्रश्न मात्र अद्याप सुटलेला नाही. शिक्षक आणि विद्यार्थी यांचे गुणोत्तर आधीच पालिका शाळांमध्ये बिघडलेले आहे. मोठ्या संख्येने पुरेसे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे. त्यामुळे पालिका शाळांमध्ये शिक्षकांची पदे कधी भरणार असा सवाल नेहमी केला जात होता.
हेही वाचा >>>‘इरॉस’ पुन्हा प्रेक्षकांच्या सेवेत! सात वर्षांनी उघडलं मुंबईतल्या सर्वात दिमाखदार सिनेमागृहाचं दार
पालिकेच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरली जाणार आहेत. त्याकरीता पालिकेच्या शिक्षण विभागाने किती शिक्षकांची गरज आहे ते देखील राज्य सरकारला कळवले होते. मात्र ही भरती कधी होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. शिक्षण विभागाने आता याकरीता जाहिरात दिली असून पवित्र पोर्टलवर नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे.शिक्षकांच्या जागा रिक्त असल्या तरी सध्या तासिका तत्वावर काही सेवानिवृत्त शिक्षकांची सेवा घेण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षकांची कमतरता भरून काढली आहे. परंतु, या भरतीमुळे आम्हाला कायमस्वरूपी शिक्षक मिळतील अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>>“देवेंद्र फडणवीस जर माणसाच्या मृत्यूला श्वानाची किंमत देणार असतील तर..”, जितेंद्र आव्हाड यांची टीका
पात्र उमेदवारांना १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर छाननी करून मग त्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. पालिकेच्या शिक्षण विभागामार्फत कागदपत्रांची पडताळणी करून मग त्यांना नियुक्ती पत्र दिले जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोणत्या माध्यमासाठी किती पदे
इंग्रजी ….६९८
हिंदी …..२३९
मराठी ….२१६
उर्दू……१८९