मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात सोमवार संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट असून पुढचे ४८ तास असाच मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मागील २४ तासांत विशेषता मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात २५० ते ३०० मिमी पावासाची नोंद झाली आहे. जो काही पाऊस पडला तो संपूर्ण रात्रीच पडला असं म्हणायला हरकत नाही. जसं पूर्वानुमान दिलं होतं त्या प्रमाणे आज बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे. त्याचाच प्रभाव म्हणून अरबी समुद्रावरून येणाऱ्या पश्चिमीकडील वाऱ्यांची तीव्रता वाढलेली आहे. त्याचा प्रभाव म्हणून पश्चिम किनारपट्टीच्या कोकणातील भागावर व मुंबई, ठाणे या परिसरात आज व उद्या पुढच्या २४ ते ४८ तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. याचबरोर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस असेल आणि मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज पुन्हा एकदा रेड अलर्ट दिलेला आहे. आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट आहे, तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.” असे भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयातील उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले आहे.

मुंबईत सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते वाहतुकीसह लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अतिवृष्टी होत असल्याने मुंबई आणि उपनगरातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Red alert for mumbai thane raigad districts msr