एकेकाळी श्रीपती ग्रुप आणि विजय ग्रुप या बडय़ा बिल्डरांच्या कचाटय़ात अडकलेला काळाचौकी येथील ३३ एकरावरील अभ्युदयनगर वसाहतीचा पुनर्विकास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चारपैकी रुस्तमजी समूहाच्या किस्टोन रिएल्टर्सची निविदा रद्द करण्याचा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराचा निर्णय अमान्य करीत बहुतांशी रहिवाशांनी रुस्तमजी समूहालाच पसंती दिली आहे. आतापर्यंत २१ गृहनिर्माण संस्थांचा कौल मिळविणाऱ्या रुस्तमजी समूहाला हा प्रकल्प खिशात टाकण्यासाठी आणखी फक्त चार गृहनिर्माण संस्थांची गरज आहे. हे सारे प्रकरण न्यायालयात असले तरी रहिवाशांचा वाढणारा कौलही चर्चेचा विषय बनला आहे.
अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या महासंघाने पुढाकार घेत मे. शिल्प असोसिएटस् यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली. शिल्प असोसिएटस्ने निविदा मागवून त्यांचा तौलनिक अभ्यास करून किस्टोन रिएल्टर्स (रुस्तमजी समूह), ऑर्नेट हौसिंग, डायनॅमिक्स रिएलिटी आणि ओमकार रिएलिटी यांची चार अंतिम विकासक म्हणून निवड केली. या चारपैकी एका विकासकाची निवड करण्याचे पत्र १३ जुलै रोजी सर्व गृहनिर्माण संस्थांना पाठविण्यात आले. त्यानुसार ९ ऑगस्ट रोजी एका गृहनिर्माण संस्थेने महाराष्ट्र सहकार कायदा आणि शासनाच्या जानेवारी २००९ च्या परिपत्रकानुसार ७९ (अ) अन्वये विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून रुस्तमजी समूहाच्या किस्टोन रिएल्टर्सची निवड केली. त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने अटी व शर्तीचा भंग असल्याचे कारण दाखवत किस्टोन रिएल्टर्स यांची निविदा रद्द करण्यात आल्याचे कळविले. परंतु प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला निविदा रद्द करण्याचा अधिकार नसल्यामुळे किस्टोन रिएल्टर्सची निविदा शर्यतीत असल्याची पत्रे गृहनिर्माण संस्थांना पाठविली. तोपर्यंत ३० ऑगस्ट रोजी सात गृहनिर्माण संस्थांनी सभेचे आयोजन केले होते. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या २१ ऑगस्टच्या पत्राला सहनिबंधक विकास रसाळ यांच्याकडे आव्हान देण्यात आले असता त्यांनीही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला निविदा रद्द करण्याचा अधिकार नाही, हे मान्य करीत किस्टोन रिएल्टर्स स्पर्धेत असल्याचा निकाल दिला. त्यामुळे ३० ऑगस्ट रोजी सात गृहनिर्माण संस्थांनी किस्टोन रिएल्टर्सची निवड केली. त्यानंतर आतापर्यंत २३ गृहनिर्माण संस्थांच्या सभा झाल्या असून त्यात २१ गृहनिर्माण संस्थांनी रुस्तमजी समूहाच्या किस्टोन रिएल्टर्सला तर दोन गृहनिर्माण संस्थांनी ऑर्नेट हौसिंगची निवड केली. येत्या रविवारी आणखी चार गृहनिर्माण संस्थांनी सभेचे आयोजन केले आहे. या संस्थानी किस्टोन रिएल्टर्सला पसंती दिल्यास एकूण ४८ गृहनिर्माण संस्थांपैकी ५० टक्के गृहनिर्माण संस्थांची पसंती रुस्तमजी समूहाला राहणार असल्यामुळे निविदेतील तरतुदीनुसार रुस्तमजी समूह अभ्युदयनगर पुनर्विकास प्रकल्पाचे विकासक ठरणार आहेत. मात्र हे प्रकरण शहर दिवाणी न्यायालयात दाखल करीत प्रतिस्पर्धी विकासक ऑर्नेट हौसिंगने आक्षेप घेतला आहे. त्याचा निकाल या वसाहतीचे भवितव्य ठरविणार आहे.
चार अंतिम विकासक ठरले तेव्हाच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांनी रुस्तमजी समूहाच्या किस्टोन रिएल्टर्सने अटीसापेक्ष ऑफर देऊन निविदेतील अटींचा भंग केल्याचे निदर्शनास आणून द्यायला हवे होते. आता ही वेळ नाही. आता रहिवाशांनाच विकासक ठरवू द्या. आतापर्यंत २३ गृहनिर्माण संस्थांच्या सभा झाल्या असून १२५८ पैकी एक हजार ८६ रहिवाशांनी रुस्तमजी समूहाच्या बाजूने कौल दिला आहे. रुस्तमजी समूहाचीच नव्हे तर ऑर्नेट हौसिंगची निविदा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने रद्द केली असती तरी महासंघाची भूमिका हीच राहिली असती. वसाहतीचा विकास याला आमच्या दृष्टीने प्राधान्य आहे.
केतन चव्हाण, सचिव, अभ्युदयनगर गृहनिर्माण संस्थांचा महासंघ
रहिवाशांचा पुनर्विकास कायद्याच्या कचाटय़ात अडकू नये, यासाठीच किस्टोन रिएल्टर्सची निविदा रद्द केली. आपण अनेक विकासकांसोबत काम करीत आहोत. परंतु अभ्युदयनगरच्या पुनर्विकासात एकाही विकासकाला झुकते माप दिलेले नाही. विकासक निवडीच्या वेळी जी बाब लक्षात आली नाही ती महासंघाच्या कायदेशीर सल्लागाराने निदर्शनास आणून दिली आणि निविदा रद्द करण्याचा अधिकार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला आहे, असाही सल्ला त्यांनी दिल्यामुळेच आपण निविदा रद्द केली.
निखिल दीक्षित, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार.