मुंबई: मोतीलाल नगर प्रमाणे दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेंट एजन्सी (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकांची नियुक्ती करून पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे. आता हेच प्रारुप म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानेही स्वीकारले असून पहिल्यांदाच दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यानुसार सी अँड डी प्रारुपाप्रमाणे प्रभादेवी-दादरमधील सात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी दुरुस्ती मंडळाने प्रस्ताव तयार केले आहेत. ते नुकतेच मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत.

या सात प्रकल्पांद्वारे ७१ इमारतीतील तब्बल ३२१६ भाडेकरुंचे पुनर्वसन करण्यात येणार आहे तर त्यातून म्हाडाला सोडतीसाठी अतिरिक्त घरे तसेच अधिमूल्याच्या रुपाने महसूल मिळणार आहे. मोतीलाल नगरच्या पुनर्विकासासाठी पैसे नसल्याचे सांगून म्हाडाने सी अँड डी प्रारुप आणले. हे प्रारुप आता मुंबई मंडळाने ११४ अभिन्यासातील विविध वसाहतीच्या पुनर्विकासासाठी लागू केले आहे. त्यात आता कामाठीपुरा पुनर्विकासासाठी सी अँड डी प्रारुप स्वीकारल्यानंतर प्रभादेवी-दादरमधील सात समूह प्रकल्पांसाठीही ते प्रारुप स्वीकारण्यात आले आहे.

प्रभादेवी-दादरमध्ये सात समूह पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आले असून त्याबाबतचे प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. त्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर पुढील कार्यवाही करून प्रकल्प मार्गी लावले जाणार आहेत.

सात प्रकल्प कोणते ?

● सुखसागर, पवनछाया, सुयश, मंगलमूर्ती, गणेशकृपा, साई सदन सिद्धीविनायक, राजाभाऊ देसाई मार्ग अशा इमारतींचा समूह पुनर्विकास होणार आहे. यात एकूण ७४५ भाडेकरू आहेत.

● खेडगल्ली, प्रभादेवी इमारतींचा पुनर्विकास होणार असून यात एकूण १० इमारतींचा समावेश आहे. या पुनर्विकासाद्वारे ६६४ रहिवाशांचे पुनर्वसन होईल.

● कादरी मॅन्शन, साकरबाई धानजी चाळ, म्युनिसिपल टी.पी. प्लॉट, सिद्धी प्रभा, उर्वशी ए आणि ब, गणेश निवास इमारती. ४६१ रहिवासी.

● बोटावाला चाळ पुनर्विकासाद्वारे २६५ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

● ४५५४.३८ चौ.मीटरवरील जनार्दन अपार्टमेंटचा समूह पुनर्विकास.

● छपरा, मोहसिन , कुलश्री सिता स्मृती, गणेश, सौदामिनी, मेघ, वरुण, राम भुवन, आकांक्षा, गुरुकृपा, अब्दुल रेहमान या २,६८३.०६ चौ. मीटरवर वसलेल्या या इमारतींचा पुनर्विकास.

● खांडके बिल्डींगचाही समूह पुनर्विकास होणार असून ३८० रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल.