मुंबई : म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयाचा अर्थात म्हाडा भवनाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. त्यानुसार ३३ (१९ ) अंतर्गत अर्थात जागेचा व्यावसायिक वापराद्वारे पुनर्विकास करण्याचे निश्चित करून यासंबंधी प्रस्तावही तयार केला. तर दुसरीकडे म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुख्यालयासाठी तात्पुरती भाडेतत्वावर जागेचा शोध सुरू केला होता. मात्र मंडळाने जागेचा शोध थांबवला असून पुनर्विकास प्रस्ताव तूर्तास लांबणीवर टाकला आहे. म्हाडा भवनाची इमारत सध्या तरी सुस्थितीत असून पुढील काही वर्षे कोणताही धोका नसल्याचा मुद्दा उपस्थित करून म्हाडाने तूर्तास पुनर्विकासाचा विचार बाजूला सारल्याची माहिती समोर येत आहे.
३३ (१९) अंतर्गत पुनर्विकास
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हक्काची घरे देण्याची जबाबदारी म्हाडावर आहे. त्यानुसार आतापर्यंत म्हडाने राज्यभर लाखो घरे बांधून सर्वसामान्यांना ती वितरित केली. म्हाडाचे मुख्यालय वांद्रे पूर्व, कलानगर येथे आहे. वांद्रे येथील ९ हजार २०३ चौ मीटर जागेवर १९७७ मध्ये म्हाडाच्या मुख्यालयाची इमारत उभारण्यात आली. मात्र आता या इमारतीची दुरवस्था झाल्याचा मुद्दा उपस्थित करीत म्हाडाने मुंबई मंडळाच्या माध्यमातून म्हाडा भवनाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा पुनर्विकास ३३ (३) (जागेचा सरकारी वापर करून पुनर्विकास) ऐवजी ३३ (१९) (जागेचा व्यावसायिक वापर करून पुनर्विकास) अंतर्गत करावा अशी भूमिका सरकारने घेतली. ३३ (१९) अंतर्गत म्हाडा भवनाचा पुनर्विकास करता येणार नाही, असा मुद्दा उपस्थित करीत म्हाडाने यास नकार दिला. यावरून बराच वाद सुरू होता. शेवटी म्हाडाला सरकारचे म्हणणे मान्य करावे लागले आणि म्हाडाने ३३ (१९) अंतर्गत पुनर्विकास करण्याचा अंतिम निर्णय घेतला. या निर्णयानुसार मुंबई मंडळाने यासाठीचा प्रस्ताव तयार केला. मात्र अद्याप हा पुनर्विकास मार्गी लागेला नाही.
पुनर्विकासाचा प्रस्ताव मान्यतेच्या प्रतीक्षेत असताना मंडळाने म्हाडा भवनाची पूर्णपणे रंगरंगोटी करून घेतली. अनेक अधिकाऱ्यांच्या दालनाचे नूतनीकरण करण्यात आले, काही दालनाचे नूतनीकरण सुरू आहे. त्याचवेळी इमारतीची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर आता म्हाडा भवनातील दालनाचा कायापालट करण्यासाठी दीड कोटी रुपयांचा सुशोभिकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याचवेळी भवनाच्या आवारातच ३६ लाख रुपये खर्च करून नुकतेच ई – सुविधा केंद्र उभारण्यात आले असून लवकरच ई – सुविधा केंद्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे. एकूणच भवनात इतकी कामे सुरू असल्याने आता पुनर्विकासाचा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडा भवनाचा प्रस्ताव तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे. भवनाच्या इमारतीला पुढील १० वर्षे तरी काहीही धोका नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत हा निर्णय घेण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.