लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : ठाणे, माजिवडे येथील वर्तक नगर पोलीस वसाहतीचा रखडलेला पुनर्विकास अखेर आता मार्गी लागणार आहे. या पुनर्विकासासाठी काढण्यात आलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तीन कंपन्यांनी तांत्रिक निविदा सादर करत या पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. तेव्हा आता लवकरच आर्थिक निविदा खुल्या करत हा प्रकल्प म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मार्गी लावला जाणार आहे.

वर्तक नगर येथील म्हाडा अभिन्यासात कोकण मंडळाकडून १९७३ मध्ये पोलिस वसाहत उभी करत यातील घरे पोलिसांना निवासस्थान म्हणून देण्यात आली होती. या वसाहतीतील इमारती जर्जर झाल्याने हा इमारतीच्या पुनर्विकासाची मागणी होऊ लागली. काही वर्षांपूर्वीच या इमारती रिकाम्या करत इमारतींचे पाडकाम करण्यात आले आहे. दरम्यान कोकण मंडळाने हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेत प्रकल्पाची व्यवहार्यता तपासली. मात्र आर्थिक दृष्ट्या प्रकल्प अव्यवहार्य ठरत असल्याने पुनर्विकास रखडला होता. मात्र पुनर्विकास करणे आवश्यक असल्याने शेवटी फेब्रुवारीत म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत प्रकल्पास मान्यता देण्यात आली. प्रकल्प व्यवहार्य ठरवा यासाठी कोकण मंडळाला उपलब्ध होणाऱ्या हिश्श्यातील भूखंडावर घरे बांधण्याऐवजी भूखंडाचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रकल्प खर्च वसूल होणार आहे.

आणखी वाचा-मुंबई : शेअर मार्केट गुंतवणूकीच्या नावाखाली फसवणूक, एकाला अटक

कोकण मंडळाच्या प्रस्तावानुसार या प्रकल्पात पोलिसांसाठी ५३८ चौ फुटांची ३८० घरे बांधण्यात येणार आहेत. चार दुकानांचे पुनर्वसन करत येथील २०० झोपड्यांचेही पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर एक पोलीस ठाणेही बांधून देण्यात येणार आहे. या पुनर्विकासासाठी ४०० कोटी खर्च अपेक्षित आहे.

अशा या पुनर्विकासासाठी मार्चमध्ये कोकण मंडळाने निविदा मागविल्या होत्या. तेव्हा नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकार्याने दिली. यातील एक कंपनी एनसीसी असून तर दोन कंपन्यांची नावे समजू शकली नाहीत. दरम्यान आता तांत्रिक निविदांची छाननी करत लवकरच आर्थिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर कंत्राट अंतिम करत कामास सुरुवात केली जाणार असल्याचेही या अधिकार्याने सांगितले. त्याचवेळी दोन भूखंडांच्या ई लिलावासाठी काढण्यात आलेल्या निविदा अद्याप खुल्या करण्यात आलेल्या नाहीत. दोन भूखंडांचा ई लिलाव लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. कारण या ई लिलावातुन येणाऱ्या रक्कमेतुनच वर्तक नगर पुनर्विकास मार्गी लावला जाणार आहे. त्यामुळे भूखंडांच्या ई लिलावाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Redevelopment of vartaknagar police colony will be on the way financial tenders will be opened soon mumbai print news mrj
Show comments