ठोस उपाययोजना केल्याचा दावा
राज्यात गेल्या दोन-तीन वर्षांत कुपोषण व अन्य आजारांमुळे होणाऱ्या बालमृत्यूंची संख्या कमी झाली आहे, असा दावा महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. आदिवासी जिल्ह्य़ांतील कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
पालघर जिल्ह्य़ातील कुपोषण व बालमृत्यूच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत राज्यपालांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, सार्वजनिक आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यांची बैठक घेऊन कुपोषण निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात विष्णू सावरा यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीनंतर आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत, असे मुंडे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्य़ामध्ये केवळ कुपोषणामुळेच बालमृत्यू झालेले नाहीत, त्याला अन्य आजारही कारणीभूत आहेत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. या जिल्ह्य़ात २०१३-१४ मध्ये ४८५ बालमृत्यू झाले होते. २०१४-१५ मध्ये हे प्रमाण ४५७ पर्यंत खाली आले. या वर्षांच्या ऑगस्ट अखेपर्यंत २०८ बालमृत्यूंची नोंद झाल्याची माहिती त्यांनी दिली.