मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या मनमानी कारभाराला प्रशासनाने चाप लावण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून विभाग कार्यालयांतील अभियंत्यांची थेट बदली करण्याचे सहाय्यक आयुक्तांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. भविष्यात विभाग कार्यालयांतील अभियंत्यांच्या बदलीचा प्रस्ताव परिमंडळातील उपायुक्तांच्या मान्यतेनंतर नगर अभियंता कार्यालयामार्फत संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) / अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्याकडे सादर करावा लागणार आहे. पूर्वीप्रमाणे सहाय्यक आयुक्तांना अभियंत्यांची थेट बदली करता येणार नाहीत. इतकेच नव्हे तर यापूर्वी केलेल्या अभियंत्यांच्या बदलीला उपायुक्तांची कार्योत्तर मंजुरी घ्यावी लागणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतल विविध खाती, विभाग आणि रुग्णालयांमध्ये नगर अभियंता कार्यालयामार्फत अभियंत्यांची पदे भरण्यात येतात. मात्र विभाग कार्यालयांतील विविध खात्यांमधील अभियंत्यांची मनमानीपणे बदली करण्यात येत होत्या. काही अभियंत्यांना कामाशिवाय बसवून ठेवण्यात येत होते. या प्रकारांमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला होता. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अभियंत्यांच्या बदलीबाबतच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या संदर्भात अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार विभाग कार्यालयाच्या स्तरावर अपवादात्मक परिस्थितीत अभियंत्यांची विभागातील अंतर्गत खात्यात (उप विभागामध्ये) बदली करण्यासाठी संबंधित सहाय्यक आयुक्तांना परिमंडळातील उपायुक्तांना प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. उपायुक्तांनी मान्यता दिल्यानंतर हा प्रस्ताव नगर अभियंता कार्यालयामार्फत संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) / अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांना सादर करावा लागणार आहे. उपविभागाअंतर्गत (बिटनिहाय) बदली करण्याची आवश्यकता असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्तांना त्यासाठी विभागीय उपायुक्तांची मंजुरी घ्यावी लागणार आहे. तसेच संबंधित अभियंत्याच्या बदली आदेशाची प्रत नगर अभियंता कार्यालयास पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्याचबरोबर सहाय्यक आयुक्तांनी यापूर्वी केलेल्या अभियंत्यांच्या बदलीबाबत संबंधित परिमंडळीय उपायुक्तांची कार्योक्त मंजुरीही घ्यावी, असे आदेश या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.