मुंबई : राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यु आणि चिकनगुनिया या साथीच्या आजारांवर दोन वर्षांत नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारला यश आले आहे. डेंग्यु आणि चिकनगुनिया या दोन्ही साथीच्या आजारांमध्ये घट झाली आहे. त्याचप्रमाणे मृत्यूतही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात २०२१ मध्ये १२ हजार ७२० डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. तर ४२ जणांचे मृत्यू झाले होते. मात्र २०२२ मध्ये राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले. २०२२ मध्ये राज्यात ८ हजार ५७८ डेंग्युचे रुग्ण आढळले तर २७ जणांचा मृत्यू झाला.२०२१ च्या तुलनेत सन २०२२ मध्ये डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या संख्येत ४० टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे २०२३ मे अखेरपर्यंत राज्यात १ हजार २३७ डेंग्यु रुग्ण आढळले तर अद्याप एकही मृत्यू झाला नाही.

हेही वाचा >>> रखडलेल्या झोपु योजनांसाठी निवड झालेले ३० विकासक!, काही विकासक अपात्र असल्याचा आरोप

डेंग्यूप्रमाणे चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येतही मागील दोन वर्षांत घट झाली. राज्यात २०२१ मध्ये चिकनगुनियाचे २ हजार ५२६ रुग्ण आढळुन आले होते. २०२२ मध्ये हीच संख्या १ हजार ८७ वर आली. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये चिकनगुनियाच्या रुग्णांच्या संख्येत जवळपास ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. २०२३ मे अखेरपर्यंत राज्यात २०० चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

डेंग्यू तापाचे प्रकार

१) डेंग्यू ताप हा फ्ल्यू (DF ) सारखा आजार आहे.

२) रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप (DHF)

३) डेंग्यू शॉक सिड्रॉम (DSS) हा तीव्र आजार आहे. त्यात मृत्यूही होण्याची शक्यता असते.

डेंग्यू, चिकनगुनियाचा प्रसार कसा होतो ?

डेंग्यू हा विषाणूजन्य किटकजन्य रोग आहे. डेंग्यू, चिकनगुनिया या रोगाचा प्रसार दुषित एडिस एजिप्टाय प्रकारातील डासाच्या मादीमार्फत होतो. माणसाला हा डेंग्यू विषाणू दुषित डास चावल्यानंतर साधारणपणे ५ ते ६ दिवसात डेंग्यू तापाची लक्षणे दिसू लागतात.

चिकनगुनिया आजाराची लक्षणे

ताप, डोकेदुखी, उलटी, मळमळ, अंगावर चट्टे उमटणे व सांध्यातून हाडे वळणे इत्यादी आहेत.

आजरांच्या नियंत्रणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना

– गरजेनुसार उद्रेकग्रस्त भागात धूर फवारणी केली जाते.

– घरातील व परिसरातील डासअळ्या आढळून आलेले पाण्याच्या साठयांमध्ये अळीनाशक टेमिफॉस वापरले जाते. कायम पाणीसाठयात गप्पीमासे सोडणे

– डेंगी चिकुनगुनिया जनजागृतीसाठी पाणी साठवणूकीच्या भांडयांची झाकणे घटट् बसविणे. आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस ठरवून त्या दिवशी पाणी साठवणूकीची भांडी रिकामी करून, घासून पुसून कोरडी करून पुन्हा पाणी भरण्यासाठी वापरणे.

– घरातील व परिसरातील निरुपयोगी वस्तु उदा. फुटके पिंप, टायर, भांडी, कुंडया इत्यादी वस्तूंची विल्हेवाट लावणे.

– राष्ट्रीय डेंग्यू दिन ( १६ मे ) साजरा करण्यात येतो

– डेंग्यू प्रतिरोध महिना जुलै केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनतेमध्ये जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिरोध महिना विविध उपक्रमाद्वारे राबविण्यात येणार आहे.

– शालेय डेंग्यू जागृती मोहिम माध्यमिक शाळांमधील इयत्ता ८ वी ते १० वी च्या मुलांमध्ये दर वर्षी डेंग्यू, चिकुनगुनिया प्रतिबंध व नियंत्रण संदर्भात ऑगस्टमध्ये शालेय डेंग्यू जागृती मोहिम राबविण्यात येत आहे.

– डेंग्यू / चिकुनगुनिया आजाराच्या निदानासाठी राज्यात ४३ सेंटीनल सेंटर्स स्थापन करण्यात आली आहेत.

– राज्यशासनामार्फत विविध उपक्रमाच्या माध्यमातून उदा. प्रभात फेरी, गटसभा, मेळावे, विविध प्रशिक्षणे किटकशास्त्रीय जनजागृती करून प्रसार नियंत्रण केले जाते.