मुंबई: राज्य सरकारकडून विलंब झाल्याने कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवणूक करणारी सौदी अरेबियाची ‘अरामको’ ही कंपनी पाकिस्तानात गेली आहे. तरीही केंद्र सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्यांच्या मदतीने कोकणात बारसू येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणारे हे बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ या संघटनेशी संबंधित असून त्यांना या संघटनेचा पैसा येतो, असा आरोपही फडवणीस यांनी यावेळी केला.
सरकारला तेलशुद्धीकरण प्रकल्प गावकऱ्यांना डावलून करायचा नाही. ज्यांना देशाचा विकास नको आहे, असे लोक या प्रकल्पाला विरोध करीत आहेत. ही तिच माणसे आहेत की जी ‘आरे’, ‘ बुलेट ट्रेन’, या प्रकल्पांच्या विरोधातील आंदोलनात सहभागी होती. काही माणसे ‘नर्मदा’ आंदोलनात ही सहभागी होती. ही माणसे वारंवार बंगळुरूमध्ये जातात. त्यांच्या बँक खात्यावर भारतात बंदी घातलेल्या ‘ग्रीनपीस’ या संघटनेकडून पैसे येतात, असा आरोप फडणवीस यांनी केला.