मुंबई : अमेरिकास्थित भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकाला तो एचआयव्हीग्रस्त असल्याच्या कारणास्तव उड्डाण करण्यास नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) नकार दिला आहे. डीजीसीएच्या निर्णयाला या वैमानिकाने वडिलांमार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

एचआयव्हीग्रस्त असल्याने अतिरिक्त किंवा वारंवार वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी आपण तयार आहोत. परंतु, वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असूनही, आपल्याला मुख्य वैमानिक म्हणून उड्डाण करण्यास तत्त्वतः परवानगी नाकारून आणि केवळ सहवैमानिकाची भूमिका पार पाडण्यास सांगून भारतातील आपले व्यावसायिक वैमानिक होण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत, असे मत या तरुण वैमानिकाने याचिकेत मांडले आहे. तसेच, मुख्य वैमानिक म्हणून त्याला परवानगी नाकारणारे डीजीसीएचे प्रमाणपत्र रद्द करण्याची आणि एचआयव्हीग्रस्त असल्याचा पूर्वग्रह न ठेवता शारीरिक आरोग्यावर आधारित त्याची वैद्यकीय चाचणी घेण्याचे आदेश देण्याची या वैमानिकाने मागणी केली आहे.

हेही वाचा – Monsoon Update : पुढील काही तासांत मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

या वैमानिकाच्या याचिकेनुसार, नोव्हेंबर २०२० मध्ये त्याने नागरी व्यावसायिक वैमानिक डीजीसीएच्या परीक्षेची तयारी सुरू केली. जुलै २०२१ मध्ये करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत तो मुख्य वैमानिक म्हणून काम करण्यासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष देण्यात आला. त्यानंतर, ८ ऑक्टोबर रोजी, त्याने पहिल्याच प्रयत्नात डीजीसीएच्या तीन परीक्षा उत्तीर्ण केल्या. परंतु, १४ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत तो एचआयव्हीग्रस्त असल्याचे निदान झाल्याचे त्याला कळवण्यात आले. पुढे, १० डिसेंबर रोजी, त्याला व्यावसायिक वैमानिक म्हणून उड्डाणासाठी अयोग्य असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्याच्या विनंतीनंतर त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या चाचणीच्या निष्कर्षानंतर त्याला केवळ सहवैमानिक म्हणून प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचे डीजीसीएने स्पष्ट केले.

हेही वाचा – मुंबईत आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट कंपनीच्या कर्मचाऱ्याचं? महत्त्वाची माहिती आली समोर

डीजीसीएने आपल्याला मुख्य वैमानिक म्हणून उड्डाण करण्यास परवानगी नाकारल्याने कोणत्याही विमान कंपनीत नोकरी करण्याची आपली संधी धूसर झाली आहे. डीजीसीएचा निर्णय हा आपल्या समानता, व्यवसाय आणि जीवनाच्या मूलभूत अधिकारांचे स्पष्ट उल्लंघन आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक व्यवस्थेचे उल्लंघन असल्याचा दावाही याचिकाकर्त्या वैमानिकाने केला आहे. आपण एचआयव्हीग्रस्त असूनही २४ मार्च २०२३ रोजी, अमेरिकन विमान वाहतूक प्रशासनाने आपल्याला उड्डाणासाठी योग्य घोषित केले आणि सध्या आपण व्यावसायिक परवान्यासाठी प्रशिक्षण घेत आहोत. एकीकडे, डीजीसीएच्या मनमानी आणि अन्यायकारक निर्णयामुळे आपल्याला मुख्य वैमानिक म्हणून उ्ड्डाण करण्याची संधी नाकारली जात असताना, दुसरीकडे अमेरिकेत मात्र अशा कोणत्याही परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागत नाही, असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.