मुंबई : भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून लोकसभा निवडणुकीत काम न केलेल्या किंवा ज्या मतदारसंघात पुरेसे मताधिक्य मिळालेले नाही, अशा आमदारांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्याचा भाजपचा विचार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांकडे असलेल्या विद्यामान आमदारांच्या जागा शक्यतो त्याच पक्षांकडे कायम ठेवण्याचे सूत्र ठेवून वरिष्ठ नेत्यांनी जागावाटपाच्या चर्चेस सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विरोधकांकडे असलेल्या ७८ जागांचे वाटप कोणत्या सूत्राने करायचे, याबाबत वरिष्ठ नेत्यांचा विचार सुरू असून सर्वेक्षण अहवालानुसार संबंधित पक्षाला जागा सोडण्यात येणार आहे. भाजपने कोणत्याही परिस्थितीत १५० हून अधिक जागा लढविण्याचे निश्चित केले आहे. भाजपच्या प्रदेश सुकाणू समितीची बैठक गुरुवारी प्रदेश कार्यालयात रात्री उशिरापर्यंत झाली. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, राष्ट्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह वरिष्ठ नेते सुमारे चार-पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीस उपस्थित होते.

हेही वाचा >>>विशाळगडावरील हिंसक घटनांचे प्रकरण उच्च न्यायालयात; आज तातडीने सुनावणी

७८ जागांचे वाटप कळीचा मुद्दा

महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी जागावाटपाची चर्चा सुरू केली असून विद्यामान आमदार असलेल्या जागा शक्यतो तेच पक्ष लढवतील. काही जागांची अदलाबदल होऊ शकते. भाजपचे १०३ आमदार असून १२ अपक्ष व अन्य आमदारांचा पाठिंबा गृहीत धरता भाजपकडे ११५ आमदार आहेत. शिंदे गटाकडे ४० आणि १० अपक्ष असे ५० आमदार, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४५ आमदार आहेत. या २१० जागांमध्ये काही जागांवर अदलाबदल होऊ शकते. मात्र उर्वरित ७८ जागांचे वाटप कोणत्या निकषांवर करायचे, याबाबत विचार सुरू असून विधानसभानिहाय सर्वेक्षण अहवाल, लोकसभा निवडणुकीत त्या विधानसभा मतदारसंघात महायुतीला मिळालेली मते किंवा मताधिक्य आणि चांगला उमेदवार तिघांपैकी कोणत्या पक्षाकडे आहे, या मुद्द्यांवर हे जागावाटप होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

भाजपला रामदास आठवले गट, रासप व अन्य घटकपक्षांसाठीही काही जागा सोडाव्या लागणार आहेत. जागावाटपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातच चर्चा सुरू असली तरी महायुतीतील पक्षांचे काही नेते त्यावर जाहीर वक्तव्ये करीत आहेत, हा मुद्दाही उपस्थित झाला. अजित पवार यांच्याशी युती केल्याने भाजप नेते व कार्यकर्ते नाराज आहेत, याबाबत रा.स्व. संघ विचारांशी जवळीक असलेल्या ‘साप्ताहिक विवेक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखामुळे जनता व कार्यकर्त्यांमध्ये गेलेला संदेश व होत असलेली चर्चा आदी मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी नमूद केले.

भाजपचे अधिवेशन पुण्यात २१ जुलैला होत असून त्यातील कामकाजाविषयीही बैठकीत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल आणि राज्याच्या अर्थसंकल्पातील तरतुदी, महत्त्वाकांक्षी योजना याबाबत सरकारच्या अभिनंदनाचे ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Regarding the delay in the lok sabha elections bjp senior leaders discussed various issues including seat allocation mumbai amy
Show comments