मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राकडून आगामी ४८ तासांमध्ये मुंबई व उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची तसेच,  काही ठिकाणी अतिमुसळधार पावासाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच,  येत्या पाच दिवसात मुंबईसह कोंकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

नियंत्रण कक्षांना पालिकेचा दक्षतेचा इशारा

भारतीय हवामान विभागाने १३ व १४ जून या कालावधीदरम्यान मुंबई अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा दिला असल्यामुळे पालिका सज्ज झाली आहे. मुंबईतील समुद्रकिनारे आणि समुद्र किनाऱ्यांलगतचा परिसर आदी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात आले आहे. तसेच या पार्श्वभूमीवर पालिकेने नियंत्रण कक्षांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, मुंबईसह उपनगरात रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. तर, मुंबई व कोकण किनारपट्टीस अतिवृष्टीचा देखील इशारा दिलेला आहे. आज सकाळपासून मुंबईत अंधेरी, दादर, सायन, कुर्ला, परळ, कुर्ला या ठिकाणांसह पश्चिम उपनगरात पाऊस सुरू आहे. अनेक भागांमधील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनाचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दहा दिवसांतच महिन्याभराचा पाऊस

पूर्व मोसमी सरींना असलेला जोर, नियोजित वेळेच्या दोन दिवस आधीच मुंबईत दाखल झालेला मोसमी पाऊस, या कारणांमुळे मुंबईत यावर्षी पावसाने जून महिन्याची सरासरी पहिल्या १० दिवसांतच ओलांडली. हवामान विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगरातील पावसाची सरासरी संपूर्ण जून महिन्यासाठी ५०५ मिलीमीटर आहे; मात्र यंदा १ ते ११ जून, सकाळी ८.३० वाजेपर्यंत उपनगरात ५३४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.