१५ मेपर्यंतची मुदत; अन्यथा ५ हजार दंड व कारावासाची शिक्षा
मुंबईमध्ये गल्लोगल्ली वधू-वर सूचक मंडळे थाटून सर्वसामांन्यांची लूट करणाऱ्यांना चाप बसविण्याची तयारी राज्य सरकार आणि महापालिकेने सुरू केली आहे. समस्त वधू-वर सूचक मंडळांना अथवा ते चालविणाऱ्या व्यक्तींना येत्या १५ मेपर्यंत विवाह निबंधकांकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी न करणाऱ्या अथवा नोंदणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास पाच हजार रुपये दंड अथवा सहा महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी वधू-वर सूचक मंडळे सुरू आहेत. काही व्यक्ती, तर काही सामाजिक, ज्ञाती संस्थांच्या माध्यमातून ही मंडळे चालविली जातात. या मंडळांवर कोणाचेच नियंत्रण नाही. वधू-वर परिचयापासून थेट त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकण्यापर्यंतची कामे या मंडळांच्या माध्यमातून चालतात. त्यासाठी वधू-वरांना मोठी रक्कमही मोजावी लागते. अशा मंडळांकडून वधू किंवा वराची फसवणूक झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर न्यायालयाने वधू-वर सूचक मंडळांची नोंदणी करण्याचे आदेश सरकारला दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील वधू-वर सूचक मंडळांची विवाह निबंधकांकडे नोंदणी करण्याची जबाबदारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी, साहाय्यक आरोग्य अधिकारी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी आणि संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. येत्या १५ मेपर्यंत मंडळ अथवा व्यक्तीची विवाह निबंधकांकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विवाह मंडळांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे अधिकार व मंडळे रद्द करण्याचे अधिकारही निबंधकांना आहेत. नियम न पाळणाऱ्या विवाह मंडळांची केवळ नोंदणी रद्द होणार नाही, तर मंडळ चालकास पाच हजार रुपयांपर्यंत दंड अथवा सहा महिन्यांपर्यंत साध्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते.
वधूवर सूचक मंडळांना नोंदणी सक्तीची
येत्या १५ मेपर्यंत मंडळ अथवा व्यक्तीची विवाह निबंधकांकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे.
Written by प्रसाद रावकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-04-2016 at 03:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Registration compulsory for marriage bureau