मुंबई : राज्यभरातील १०७ महारेरा नोंदणीकृत गृहप्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. या प्रकल्पांची यादी महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी ७ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जुन्या ८८ प्रकल्पांबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी १७ जूनपर्यंत असलेली मुदत ७ जुलै अशी करण्यात आली आहे. नवीन १९ प्रकल्पांबाबत ७ जुलैपर्यंत आक्षेप नोंदविता येतील असे महारेराने जाहीर केले आहे.
नवीन गृहप्रकल्पांना महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. तर विहित मुदतीत प्रकल्प पूर्ण करणेही विकासकांसाठी बंधनकारक आहे. जे विकासक वेळेत प्रकल्प पूर्ण करत नाहीत किंवा नोंदणीची मुदत संपते त्या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याची तरतूद रेरा कायद्यात आहे. आता महारेराने १० फेब्रुवारी रोजी एका परिपत्रकाद्वारे अव्यहार्य आणि कधीही पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रकल्पाची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता सुरु झाली असून त्यानुसार पहिल्या टप्प्यात महारेराने अशा ८८ प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शून्य नोंदणी, निधी उपलब्धता नसणे, प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य असणे, न्यायालयीन खटले, कौटुंबिक वाद, नियोजनाबाबत शासकीय नवीन अधिसूचना या आणि अशा काही कारणांमुळे पूर्ण होऊ न शकणाऱ्या प्रकल्पांचा यात समावेश आहे.
हेही वाचा – मुंबई, पुण्यात मोसमी पाऊस सुरू, एकाच दिवसांत व्यापला देशाचा मोठा भाग
अशा ८८ प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्यासाठी महारेराने १७ जूनपर्यंत आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले होते. मात्र विहित मुदतीत एकही आक्षेप नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यासाठी आणखी एक संधी ग्राहक आणि संबंधितांना देण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे. त्यानुसार ही मुदत आता ७ जुलै अशी करण्यात आली आहे. त्याचवेळी असे आणखी १९ प्रकल्प शोधून महारेराने त्यांचीही नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही ७ जुलैपर्यंत secy@maharera.mahaonline.gov.in या मेलवर आक्षेप नोंदविण्याचे आवाहन केले आहे. विहित मुदतीत आक्षेप न आल्यास नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
सर्वाधिक प्रकल्प पुण्यातील
एकूण १०७ प्रकल्पांपैकी नोंदणी रद्द करण्यात येणारे सर्वाधिक प्रकल्प हे पुण्यातील आहेत. पुण्यातील तब्बल ४१ प्रकल्प या यादीत आहेत. त्याशिवाय रायगडमधील १६ आणि ठाण्यातील १२ प्रकल्पांची नोंदणी रद्द होणार आहे. पालघर ०६, मुंबई उपनगर ०५, मुंबई शहर ०४, सिंधुदुर्ग , परभणी, नाशिक प्रत्येकी ०३, नागपूर, छ. संभाजीनगर, सातारा प्रत्येकी ०२ आणि कोल्हापूर, नांदेड, लातूर, रत्नागिरी, सोलापूर आणि दादरा नगर हवेली येथील प्रत्येकी एका प्रकल्पाचा समावेश आहे.
हेही वाचा – विद्याविहार येथे दुमजली बंगला खचला, दोनजण अडकले
लोढा स्पेलन्डर प्लॅटीनो-डी, हबटाऊन सेरेने-ए विंग, लोढा कांदिवली टॉवर १, श्रीजी स्वेकअर, मिड टॉऊन रॉयल, कल्पतरू सेंट्रीनो, हबटाऊन सिद्धी अशा अनेक मोठ्या प्रकल्पांचा, नामांकीत विकासकांच्या प्रकल्पांचा यात समावेश आहे.