लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावी यासाठी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कठोर पावले उचलली आहेत. आरे वसाहतीतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरण कामात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारास महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील दोन वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ५ लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे निकृष्ट दर्जाचे सिमेंटचे मिश्रण पुरवल्याप्रकरणी दोन रेडी-मिक्स काँक्रीट प्रकल्पांची (आरएमसी प्लांट्स) नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

पुढील ६ महिन्यांसाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कामांसाठी काँक्रीट मिक्सचा पुरवठा करण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच २ रस्ते कंत्राटदारांना प्रत्येकी २० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.

मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत याकरीता मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर रस्ते कॉंक्रीटीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र काही ठिकाणी रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप होत आहे. तर काही ठिकाणी कंत्राटदारांनी रस्ता खोदून ठेवला आहे, मात्र कामामध्ये प्रगती होत नाही. त्यामुळे भूषण गगराणी यांनी कंत्राटदारांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. रस्ते काँक्रीटीकरण कामात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा, त्रुटी खपवून घेतली जाणार नाही, तसे आढळल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा भूषण गगराणी यांनी दिला आहे.

मुंबईत सिमेंट कॉंक्रीटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विषयावरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही वादळी चर्चा झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंगळवार, १५ एप्रिल रोजी या कामांची पाहणी केली. त्यानंतर आयुक्तांनी बुधवारी रस्ते कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगारला.

आरे वसाहतीतील रस्त्याच्या कामात दिरंगाई

आरे वसाहतीतील दिनकरराव देसाई मार्गाचे सिमेंट काँक्रीट व मास्टिक अस्फाल्ट सुधारणा काम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आल्यामुळे कंत्राटदारावर नोटीस बजावण्यात आली. तसेच, दंडाची आकारणी करून निकृष्ट काम त्वरित दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, दुरुस्तीच्या कामात कंत्राटदाराने अक्षम्य दिरंगाई केली असून याबाबत कंत्राटराकडून खुलासा मागवण्यात आला होता. परंतु समाधानकारक खुलासा नसल्यामुळे कंत्राटदारास मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या निविदा प्रक्रियेत पुढील २ वर्षांसाठी सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ५ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

आरएमसी प्लान्टवर कारवाई

चेंबूर येथील डॉ. नीतू मांडके मार्ग आणि डोंगरी येथील कारागृह मार्ग या ठिकाणी सुरू असलेल्या रस्ते कामांची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरी यांनी आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान स्लम्प चाचणी घेण्यात आली असता त्यात त्रुटी आढळून आली. त्यामुळे काँक्रीटीकरणासाठी आणलेले मिश्रण नाकारण्यात आले आणि मिक्सर वाहन माघारी पाठविण्यात आले. या दोन्ही प्रकरणात काँक्रीट प्रकल्पास २० लाख रूपये दंड ठोठावण्यात आला असून, त्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच, पुढील ६ महिन्यांसाठी महानगरपालिकेच्या कोणत्याही कामांसाठी काँक्रीट मिक्सचा पुरवठा करण्यास बंदी घालण्यात आली आहे.