शैलजा तिवले
मुंबई : क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या संपर्कातील सुमारे ५४ टक्के नातेवाईकांना सुप्त क्षयरोगाची (लेटंट टीबी) लागण झाल्याचे पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या ‘सुप्त क्षयरोग संसर्ग मापन आणि विश्लेषण प्रकल्पा’तून निर्दशनास आले आहे. यापैकी सुमारे ८० टक्के नातेवाईकांनी प्रतिबंधात्मक उपचार सुरू केले आहेत.
क्षयरोगाची बाधा झालेल्या रुग्णांच्या सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींमध्ये सुप्त क्षयरोगाची बाधा झाल्याची शक्यता अधिक असते. सुप्त क्षयरोग म्हणजे व्यक्तीच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्तावस्थेत असतात. अशी बाधा झालेल्या व्यक्तीमध्ये क्षयरोगाची सामान्यपणे आढळून येणारी लक्षणे नसतात. परंतु सुप्त क्षयरोगाने बाधित व्यक्तिमध्ये भविष्यात सक्रिय क्षयरोग उद्भवण्याची दाट शक्यता असते. सुप्त क्षयरोगाचे वेळीच निदान होऊन त्यावर योग्य उपचार केल्यास संबंधित व्यक्तीस भविष्यात सक्रिय क्षयरोग होण्यापासून प्रतिबंध करणे शक्य आहे. यादृष्टीने सुप्त क्षयरोगाचे मापन व विश्लेषण करणारा प्रकल्प पालिकेने सप्टेंबर २०२१ मध्ये हाती घेतला आहे.
पालिकेने सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात शहरातील १५८ क्षयरोगबाधित रुग्णांच्या कुटुंबाना भेटी दिल्या. या रुग्णांच्या थेट संपर्कात असलेल्या ५१६ नातेवाईकांच्या नावाची नोंदणी केली. यापैकी ९६ टक्के नागरिकांनी सुप्त क्षयरोगाच्या निदानासाठी आयजीआरए किंवा आयग्रा चाचणी करण्यास परवानगी दिली. यातील एकूण ५०८ नातेवाईकांचे रक्ताचे नमुने केईएम रुग्णालयात चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. चाचण्यांमध्ये ५०८ पैकी सुमारे ५४ टक्के २७३ नातेवाईकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू सुप्त अवस्थेत असल्याचे आढळले. पुढील टप्प्यात या रुग्णांना प्रतिबंधात्मक उपचार सुरू करम्ण्यासाठी समुपदेशन करण्यात आले. ८० टक्के नातेवाईकांना भविष्यात क्षयरोगाची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उर्वरीत नातेवाईकांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. परिणामी, या नातेवाईकांना पुढील पाच वर्षांत क्षयरोग होण्याची दाट शक्यता असून त्यांच्यामार्फत क्षयरोगाचा प्रसार होण्याचीही शक्यता पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
नकार देणाऱ्यांची कारणे
प्रतिबंधात्मक उपचार घेण्यासाठी नकार दिलेल्या नातेवाईकांपैकी बहुतांश जणांनी आम्हाला कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे कोणतीही औषधे घेणार नाही, हेच प्रमुख कारण सांगितले आहे. काही जणांनी खासगी दवाखाने किंवा फॅमिली फिजिशियनचा प्रतिबंधात्मक औषधे घेण्यासाठी सल्ला घेतला. डॉक्टरांनी ही औषधे घेऊ नका असे सांगितल्यामुळे उपचार घेतलेले नाहीत. तर काही जणांना कामामध्ये व्यग्र असल्याने ही उपचार पद्धती घेण्यासाठी जाऊ शकत नाही असे सांगितले आहे, अशी माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.
सात जणांना क्षयरोगाची बाधा
आयग्रा चाचणीमध्ये लेटंट क्षयरोग आढळलेल्या ५४ टक्के नातेवाईकांमध्ये सात जणांना क्षयरोग झाल्याचे आढळले आहे. यांना प्रतिबंधात्मक उपचारांऐवजी क्षयरोगाचे उपचार सुरू केले आहेत.
‘आयग्रा’ चाचणी करण्यासही नकार
रुग्णाच्या थेट संपर्कात असलेल्या नातेवाईकांपैकी ३ टक्के नागरिकांनी ही चाचणी करून घेण्यास नकार दिला आहे. कोणतीही लक्षणे नसल्यामुळे कोणतीही चाचणी करायची नाही असे नातेवाईकांचे म्हणणे आहे. काही नातेवाईक मुलांच्या चाचण्या करून घेण्यास तयार नाहीत, असेही आढळले. काही नातेवाईकांनी सुईला घाबरून चाचण्या केलेल्या नाहीत, असे डॉ. गोमारे यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक उपचार म्हणजे काय?
सुप्त अवस्थेत असलेला क्षयरोग सक्रिय होऊ नये यासाठी आठवडय़ातून तीन वेळा एक गोळी घ्यावी लागते. यामुळे रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांना क्षयरोगाची बाधा होण्यापासून प्रतिबंध करणे शक्य आहे.