सांताक्रुझ पूर्व येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात महिला रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी आरोपी नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करीत आहेत. व्ही. एन. देसाई रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. हरबन्स सिंह यांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> म्हाडा कोंकण मंडळ सोडत २०२३ : अल्प प्रतिसादामुळे सोडतपूर्व प्रक्रियेत बदल करण्याची नामुष्की
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्ही. एन. देसाई रुग्णालयात मुस्कान सय्यद सोहिल (२२) हिला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू होते आणि रुग्णाची प्रकृती स्थिर होती. त्यानंतरही सोहिल यांच्या नातेवाईकांनी दुसऱ्या मजल्यावरील स्त्री वैद्यकीय विभागात जाऊन डॉक्टर मिताली, डॉक्टर संकेत व परिचारिका निगुडकर यांच्यासोबत वाद घालण्यास सुरूवात केली. त्यावेळी घटनास्थळी सुरक्षा रक्षक दाखल झाले. दरम्यानच्या काळात वाद चिघळला आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तक्रारीनंतर भादंवि कलम ३५३, ३३२, ५०६ व महाराष्ट्र वैद्यकीय सेवा कायदा कलम ४ अंतर्गत सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमकावणे व दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.