केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी आता उमेदवारांना दोन संधी वाढवून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून त्या अनुषंगाने कमाल वयोमर्यादेमध्येही वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अधिक संधी मिळाव्यात आणि कमाल वयोमर्यादेमध्येही वाढ व्हावी, अशी मागणी उमेदवारांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने आता केंद्र शासनाने लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना दोन संधी वाढवून दिल्या आहेत. वाढवून देण्यात आलेल्या संधींच्या अनुषंगाने परीक्षा देण्याची वयोमर्यादाही वाढवण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक केंद्र शासनाच्या कार्मिक, तक्रार निवारण आणि पेन्शन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले आहे.नव्या नियमांनुसार खुल्या गटासाठी ४ ऐवजी ६ संधी मिळणार आहेत आणि वयोमर्यादा ३० ऐवजी ३२ वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
ओबीसी वर्गासाठी आता ७ ऐवजी ९ संधी मिळणार आहेत आणि वयोमर्यादा ३३ ऐवजी ३५ वर्षे राहणार आहे. एससी, एसटी प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३७ होणार आहे. ऑगस्ट २०१४ च्या परीक्षेपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.या परीक्षेची जाहिरात मे महिन्यामध्ये प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे.

Story img Loader