मुंबई : वैद्यकीय विज्ञानमधील राष्ट्रीय परीक्षा मंडळाने पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा यासाठी एमडी, एमएस, डीएनबी अभ्याक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष १५ पर्सेंटाईलपर्यंत कमी केले आहेत. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन सत्रांमध्ये राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट-पीजी) घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २३ ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात आला. राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २ हजार ५१० जागांसाठी २९ नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. राज्यातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाची पहिली फेरी २९ नोव्हेंबर रोजी झाली. तर दुसरी फेरी २४ डिसेंबरपासून राबविण्यात आली. दोन फेऱ्यांमध्ये या अभ्यासक्रमासाठी १ हजार ६९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून, ८१६ जागा रिक्त राहिल्या आहेत.
हेही वाचा : चांदिवली – असल्फादरम्यानच्या मिसिंग लिंक प्रकल्पातील अडथळा दूर, महापालिकेने पाच बांधकामे हटवली
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावेत यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नीट-पीजी २०२४ चे किमान पात्रता पर्सेंटाईल कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वैद्यकीय विज्ञानमधील राष्ट्रीय परीक्षा मंडळाने एमडी, एमएस, डीएनबी या पदव्युत्तर अभ्याक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले पात्रता निकष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वसाधारण व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल ५० वरून १५ पर्यंत कमी केले. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल ४५ वरून १० पर्यंत कमी केले आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास वर्गीय विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल ४० वरून १० पर्यंत कमी केले. हे निकष पुढील तिसऱ्या फेरीपासून लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या फेरीमध्ये बहुतांश रिक्त जागांवर प्रवेश होण्याची शक्यता असून, तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी आयुष अभ्यासक्रमांतर्गत आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी या पदवी अभ्यासक्रमांच्या पात्रता निकषांमध्ये १५ पर्सेंटाईल शिथिल करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला होता. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. पदव्युत्तर अभ्यासक्रमामधील एमडी, एमएस, डीएनबी अभ्याक्रमांसाठीचे पात्रता निकष १५ पर्सेंटाईलपर्यंत कमी केल्याने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.