मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २,०३० घरांसाठी मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात येणार आहे. नरिमन पाॅईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी १०.३० वाजता सोडतीचा निकाल जाहीर होणार असून या सोडतीत एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार सहभागी होणार आहेत.
मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार नगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण २,०३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेत सोडतीसाठी एक लाख १३ हजार ८११ अर्ज अनामत रक्कमेसह दाखल झाले होते. मात्र यापैकी २६९ अर्ज अपात्र ठरल्याने आता मंगळवारच्या सोडतीत एक लाख १३ हजार ५४२ अर्जदार सहभागी होणार आहेत. नरिमन पाॅईंट येथे पार पडणाऱ्या सोडतीसाठी अर्जदारांना प्रथम प्राधान्यनुसार प्रवेश दिला जाणार आहे. तर या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होता न येणाऱ्यांसाठी सोडतीच्या थेट प्रेक्षपणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, या सोडतीत अत्यल्प गटासाठी कमी घरे असतानाही या गटासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे या गटातील घरांसाठी कोण विजेते ठरणार याकडे सर्वच अर्जदारांचे लक्ष लागले आहे. मात्र त्याचवेळी पहाडी गोरेगावमधील मध्यम आणि उच्च गटातील घरांसह पवईतील उच्च गटातील घरांसाठी कोण विजेते ठरणार याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. कारण बाजारभावाच्या तुलनेत कमी किंमतीत मोठी आणि पंचतारांकित सुविधा असलेली घरे पहिल्यांदा म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने या घरांसाठी मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत.
हेही वाचा >>>Vandre East Assembly constituency : तिकीटवाटवरून मविआ व महायुतीत संघर्ष, उमेदवारांची वाणवा! कशी असतील राजकीय समीकरणं?
गोरेगाव आणि पवईतील मध्यम, उच्च गटातील घरांसाठी सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांनीही मोठा प्रमाणावर अर्ज केले आहे. या सोडतीत विनोदी अभिनेता गौरव मोरे, निखिल बने, अभिनेता विशाल निकम, गौतमी देशपांडे, किशोरी विज यांच्यासह अन्य कलाकारही सहभागी झाले आहेत. या कलाकारांपैकी कोणाचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होते याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पवईतील घरासाठी अर्ज केला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना सोडत जाहीर होण्यापूर्वीच सोडत लागली आहे. शेट्टी यांनी अर्ज केलेल्या संकेत क्रमांकात तीन घरांचा समावेश असून या घरांसाठी शेट्टी यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे शेट्टी यांना घर लागले असून आता मंगळवारी याची केवळ औपचारिक घोषणा होणार आहे.
हेही वाचा >>>वरळीतील सत्यम’ चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जाणार; आरक्षण बदलण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती सूचना
पुनर्विकासातील घरांच्या किंमती कमी करा – विजेत्यांची मागणी
मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीत पुनर्विकासाअंतर्गत मिळालेल्या ३७० घरांचा समावेश आहे. या घरांच्या किंमतीवरून म्हाडावर मोठी टीका होत असल्याने अखेर म्हाडाने १० ते २५ टक्के याप्रमाणे उत्पन्न गटनिहाय घरांच्या किंमतीत घट केली आहे. असे असताना या ३७० घरांमधील काही घरे मागील २०२३ च्या सोडतीतील विकली गेली नव्हती. मात्र मागील सोडतीतील विजेत्यांना म्हाडाच्या या निर्णयाचा लाभ देण्यात आलेला नाही. त्यांना महागड्या दरात घर घ्यावे लागले आहे. मात्र त्याच योजनेतील, संकेत क्रमांकामधील या सोडतीतील घर संभाव्य विजेत्याला १० ते २५ टक्के कमी किंमतीत मिळणार आहे. त्यामुळे मागील सोडतीतील पुनर्विकासातील घरांसाठी विजेते ठरलेल्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. २०२३ मधील पुनर्विकासातील घरांच्या किंमतीही कमी कराव्या, अशी मागणी आता या विजेत्यांकडून करण्यात येत आहे. या मागणीसाठी विक्रोळीमधील कन्नमवार नगरमधील काही विजेत्यांनी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे. आता राज्य सरकार आणि म्हाडा यावर काय निर्णय घेते याकडे विजेत्यांचे लक्ष लागले आहे.
बेवकास्टींगची लिंक – https://housing.mhada.gov.in
विजेत्यांची यादी पाहण्यासाठी वेबसाईट – https://housing.mhada.gov.in