मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने शुक्रवारी जाहीर केलेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या अर्थात मार्च तिमाहीच्या वित्तीय कामगिरीनुसार, निव्वळ नफ्यात २.४ टक्के वाढ नोंदवली. तेल आणि पेट्रोकेमिकल्स व्यवसायात कमकुवतपणा आणि वित्तीय खर्च वाढला असला तरी, किराणा व्यवसायात विक्री दालनांचे सुसूत्रीकरण व संख्येत कपात आणि दूरसंचार व्यवसायातील सुधारित नफाक्षमता कंपनीसाठी फलदायी ठरली.

तेल ते दूरसंचार आणि किरकोळ विक्री क्षेत्रात कार्यरत रिलायन्स इंडस्ट्रीज मात्र २०२४-२५ मध्ये १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नक्त मालमत्तेचा टप्पा गाठणारी देशातील पहिली कंपनी ठरली. गेल्या वर्षी २० लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा गाठणारी ती पहिली कंपनी ठरली होती.

जानेवारी ते मार्च २०२५ तिमाहीत रिलायन्सने १९,४०७ कोटी रुपयांचा अर्थात प्रति समभाग १४.३४ रुपये एकत्रित निव्वळ नफा कमावला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत त्याचे १८,९५१ कोटी रुपये आणि प्रति समभाग १४ रुपये या प्रमाणापेक्षा ते यंदा जास्त आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. आधीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीतील १८,५४० कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेतही तो वाढला आहे.

निकालांवर भाष्य करताना, रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२५ हे जागतिक व्यावसायिक वातावरणासाठी आव्हानात्मक वर्ष होते. ऊर्जा बाजारपेठेत लक्षणीय अस्थिरता असूनही तेल व पेट्रोकेमिकल्स व्यवसायाने तुलनेने चांगली कामगिरी केली. तर डिजिटल सेवा व्यवसायाने विक्रमी महसूल आणि नफ्याचे आकडे गाठले. ग्राहकांच्या संख्येत सातत्याने वाढ, ५ जी आमच्या ब्रॉडबँड सेवेला उत्साहदायी वाढती स्वीकृती सुरूच आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांना प्रति समभाग ५.५० रुपयांचा अंतिम लाभांशांची शिफारस केली आहे.