पहिल्या पावसात घरांचे पत्रे गळणार, मुंबईचे रस्ते, रेल्वे रूळ पाण्याखाली जाणार हे मुंबईकरांसाठी काही नवीन नाही. परंतू अवघ्या महिनाभरापूर्वी सुरू झालेली मुंबई मेट्रोसुध्दा पहिल्या पावसात जेव्हा गळायला लागते तेव्हा हसावे की रडावे असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. एवढंच नव्हे तर कित्येक महिने घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये नक्की काय तपासले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबईत आज (बुधवार) झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई मेट्रोचा एक डबा गळायला लागल्यानंतर मोठा गाजावाजा करून आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम केले म्हणून स्वत: ची पाठ थोपटून घेतलेल्या रिलायन्सच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, एका डब्याचे एसी युनिटमध्ये गळत होते आणि ही बाब लक्षात आल्यानंतर ताबडतोब तो संपूर्ण डबा सेवेतून काढण्यात आल्याचे मेट्रोतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.