मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या बहुवार्षिक वीजदर प्रस्तावास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे. त्यानुसार एक सप्टेंबरपासून नवीन दर लागू होणार असून ३०० युनिटपेक्षा कमी वीजवापर असलेल्या घरगुती वीजग्राहकांना दरवाढीचा झटका बसला आहे. तर दरमहा ३०० युनिटपेक्षा अधिक वीजवापर असलेल्या बडय़ा घरगुती ग्राहकांच्या वीजदरात चक्क कपात झाली आहे. तसेच वाणिज्यिक ग्राहकांच्या दरातही घसघशीत कपात झाली आहे. त्यामुळे ‘टाटा’कडे जाणारा बडय़ा वीजग्राहकांचा ओघ कमी होण्याची शक्यता आहे.
नवीन दर एक सप्टेंबर २०१३ पासून लागू होतील. मागील चार वर्षांच्या थकबाकीपोटी दरवर्षी ९२४ कोटी ८२ लाख रुपये या हिशेबाने तीन वर्षे वसुली होणार आहे. त्याचाही नवीन दरात समावेश आहे. तसेच शैक्षणिक संस्था, पोलिस, आरोग्य केंद्र अशा विविध सार्वजनिक सुविधांसाठी ‘सार्वजनिक सेवा’ हा नवीन गट तयार करण्यात आला आहे. त्यासाठी प्रति युनिट नऊ रुपये ६९ पैसे असा दर ठरवण्यात आला आहे. यावर्षी औद्योगिक ग्राहकांना १९ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. तर वाणिज्यिक ग्राहकांना मात्र दरात ७३ पैसे ते ९८ पैशांची कपात करून दिलासा देण्यात आला आहे. त्यामुळे वाणिज्यिक गटातील ‘रिलायन्स’चे दर हे ‘टाटा पॉवर’पेक्षाही ११ ते १८ टक्क्यांनी स्वस्त झाले आहेत.
यावर्षांबरोबरच २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षांसाठीचे वीजदरही जाहीर झाले आहेत. या दोन्ही वर्षांत सध्याच्या तुलनेत दरकपात दाखवण्यात आली आहे. छोटय़ा घरगुती ग्राहकांनाही त्याचा लाभ होणार आहे.
पुन्हा वीज कोसळली!
मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’च्या बहुवार्षिक वीजदर प्रस्तावास राज्य वीज नियामक आयोगाने मान्यता दिली आहे.
First published on: 23-08-2013 at 01:40 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reliance power hike the electricity tariff rate