लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : विधि तीन वर्षे आणि विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सुमारे ३६ हजार विद्यार्थ्यांनी अर्धवट अर्ज भरल्याचे निदर्शनास आले असून त्यांना सीईटी (सामाईक प्रवेश परीक्षा) देता येणार नाही. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीईटी कक्षाने (राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष) ३६ हजार विद्यार्थ्यांना अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांनी तातडीने अर्ज भरावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून विधि तीन वर्षे आणि पाच वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येते. दरवर्षी या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अर्ज भरतात. विधि तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला २७ डिसेंबर २०२४ पासून, तर विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेला ३ जानेवारी २०२५ पासून सुरूवात झाली. या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज नोंदणी करण्याची अंतिम तारीख २५ मार्च होती. या कालावधीत अर्ज नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विधि तीन वर्ष अभ्यासक्रमासाठी ९१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून २६ हजार अर्ज अर्धवट भरलेले आहेत. त्याचप्रमाणे विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी ३४ हजार अर्ज आले असून, १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट भरलेले आहेत. अर्धवट अर्ज भरलेल्या ३६ हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने या दोन्ही अभ्यासक्रमांना अर्ज करण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळे विधि अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अर्जात सुधारणा करण्यासाठी अखेरची संधी
काही तांत्रिक कारणास्तव, शुल्क भरल्याने वा अन्य कारणामुळे अर्धवट असलेले अर्ज पूर्ण भरण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असणार आहे. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी कोणतीही संधी विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. अर्जासंबंधी काही अडचण आल्यास, उमेदवारांनी cethelpdesk@maharashtracet.org या ई-मेलवर संपर्क साधावा किंवा सीईटी पोर्टलवरील कॅंडिडेट हेल्प मॉड्यूलचा वापर करावा. असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा अधिक अर्ज
विधि तीन वर्ष अभ्यासक्रमास २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी ६८ हजार १४४ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तर यंदा ९१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तसेच विधि पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी २०२४–२५ मध्ये २६ हजार ७५४, तर तर यंदा ३४ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.