लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : आरोग्य केंद्रामध्ये जूनमध्ये नियुक्त केलेल्या १७८ परिचारिकांच्या वेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला. यापैकी १३९ परिचारिकांचे जानेवारीमध्ये, तर उर्वरित ३९ परिचारिकांचे फेब्रुवारीमध्ये वेतन होईल, असे आश्वासन मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आले. आरोग्य विभागातील विविध कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी झालेल्या चर्चेत मागण्यांबाबत समाधानकारक तोडगा निघाला.

आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिकांची कमतरता लक्षात घेऊन प्रशासनाने जूनमध्ये १७८ सहाय्यक परिचारिका प्रसविकांची नियुक्ती केली. मात्र या परिचारिकांचा सांकेतांक क्रमांक तयार करण्यास विलंब झाल्याने मागील सहा महिन्यांपासून त्यांचे वेतन रखडले होते. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्याचबरोबरच स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अवेक्षक रिक्त पदे भरणे, कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवणे, संनिरीक्षण विभाग, क्षयरोग विभाग, कुटुंब कल्याण व माता बालसंगोपन विभागातील पदभरती, ड्रेसर व अन्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत म्युनिसिपल मजदूर युनियनच्या नेतृत्त्वाखाली कर्मचाऱ्यांनी एफ दक्षिण विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता.

आणखी वाचा-नीलकमल बोटीचा प्रवासी परवाना, नोंदणी प्रमाणपत्र अखेर निलंबित, मुंबई सागरी मंडळाची कडक कारवाई

यावेळी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये १७८ पैकी १३९ परिचारिकांचे सहा महिन्यांसह डिसेंबरमधील वेतन जानेवारीमध्ये काढण्यात येईल. तर उर्वरित ३९ परिचारिकांच्या कागदपत्रांमध्ये काही अडचणी असल्याने त्या तातडीने दूर करून त्यांचे वेतन फेब्रुवारीमध्ये काढण्यात येईल, असे आश्वासन आरोग्य विभागाकडून देण्यात आले. त्याचबरोबरच स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अवेक्षक कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत २६ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यात येईल. तसेच ड्रेसर हे ‘ड’ वर्गात येत असल्याने त्यांना संगणकीय कामातून तसेच ‘क’ वर्गातील कर्मचाऱ्यांना औषधनिर्माण विभागातील कामातून तातडीने वगळण्याच्या सूचना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या, असे म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relief for obstetricians and assistant nurses at health centres mumbai print news mrj