मुंबई : राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेच्या (एनसीटीई) सूचनेनुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षीय बीए / बीएस्सी – बीएड (एकात्मिक) या अभ्यासक्रमाचे चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये (आयटीईपी) रुपांतर करण्यात आले. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने बीए / बीएस्सी – बीएड (एकात्मिक) अभ्यासक्रमासाठी राबविलेली केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ९ मार्च रोजी जाहीर करण्यात आला.

परंतु ‘एनसीटीई’कडून राबविण्यात येणाऱ्या अर्ज नोंदणीची प्रक्रिया १६ मार्चपर्यंत होती. परिणामी, कमी वेळामध्ये अर्ज नोंदणी कशी करायची याबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. मात्र ‘एनसीटीई’ने अर्ज नोंदणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेला चार वर्षीय बी.ए./बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा अभ्यासक्रमाचे चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षक परिषदेने फेब्रुवारीमध्ये घेतला. तसेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून चार वर्षीय एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) ‘राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा’ (एनसीईटी) राबविण्यात येणार असल्याचे परिषदेने स्पष्ट केले.

त्याच वेळी चार वर्षांच्या बी.ए/बी.एससी-बी.एड (एकात्मिक) अभ्यासक्रमासाठी सामाईक प्रवेश परीक्षा आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व राज्यातील तंत्रशिक्षण विभागाला करण्यात आली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ४ मार्च २०२५ रोजी परिषदेच्या निर्णयाबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाला पत्राद्वारे कळवले. मात्र राज्यात या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जानेवारीपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती.

बी.ए/बी.एससी-बी.एड (एकात्मिक) या अभ्यासक्रमासाठी जवळपास ३ हजार ५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९६४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून अर्ज निश्चित केले होते. त्यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ४ वर्षांच्या बी.ए./बी.एससी-बी.एड (एकात्मिक) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एनटीएमार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एनसीईटी २०२५’साठी ऑनलाइन अर्ज करण्याबाबत ९ मार्च रोजी परिपत्रक काढून सूचना केली. मात्र एनटीएच्या संकेतस्थळावर आयटीईपी या अभ्यासक्रमाला अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ माार्च होती. त्यामुळे कमी वेळेत अर्ज नोंदणी कशी करायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला होता.

विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल

सीबीएसई व अन्य मंडळाच्या परीक्षा सुरू असल्याने अनेक विद्यार्थी, संस्थांकडून अर्ज नोंदणी करण्यासाठी परिषदेकडे मुदतवाढ देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत परिषदेने अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांना ३१ मार्च रोजी रात्री ९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे, तर ११.५० पर्यंत शुल्क भरून अर्ज निश्चित करायचा आहे. यादीसंदर्भातील तक्रार, प्रवेश पत्र आदींसंदर्भातील तारीख संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

२९ एप्रिल रोजी होणार परीक्षा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा २९ एप्रिल रोजी होणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नडा, मल्याळम, मराठी, ओडिशा, पंजाबी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू या भाषांमध्ये होणार आहे.