लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नागन मध्यम प्रकल्पाच्या १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय खर्चास मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

तापी पाटबंधारे विकास महामंडळातंर्गत येणाऱ्या नागन मध्यम प्रकल्पातून तापी खोऱ्यातील नागन नदीवर एकूण २६.४८ दलघमी साठवण क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे नवापूर तालुक्यातील १६ गावातील २ हजार ४८६ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेतर्गंत १६१ कोटी १२ लाख रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

बीडमधील तीन बंधाऱ्यांसाठी ५९ कोटींची तरतुद

बीड जिल्ह्यातील ३० वर्षांपूर्वीच्या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यासाठी एकूण ५९ कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरीत करण्याठी १७.३० कोटी रुपये. टाकळगाव हिंगणी येथील कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यासाठी १९ कोटी ६६ लाख रुपये आणि सिंदफणा नदीवरील निमगांव कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यासाठी २२ कोटी ८ लाख रुपायांच्या कांमांना मान्यता देण्यात आली आहे.