मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरधारांमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत मुबलक पाणीसाठा असून तो आता ७८.६३ टक्के झाला. १६ जुलै  या दिवशीचा गेल्या सहा वर्षांतील हा सर्वाधिक साठा आहे. सातही जलाशयांत मिळून सध्या ११ लाख ३८ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठय़ाची चिंता मिटली.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ऊर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही जलाशयांत मिळून सध्या ७८.६३ टक्के पाणीसाठा आहे. जून महिन्यात पाऊस न पडल्यामुळे हा साठा ९ टक्क्यांपर्यंत खालावला होता.  जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून पडणाऱ्या पावसामुळे साठय़ात मोठी वाढ झाली.

 गेल्या दोन वर्षांपेक्षा तिप्पट पाणीसाठा जमा झाला आहे.  मोडक सागर आणि तानसा हे तलाव भरून वाहू लागल्यानंतर आता विहार, तुळशी हे मुंबईजवळचे तलावही भरण्याच्या मार्गावर आहेत.

चार दिवसांनी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता

जुलैत १५ दिवस जोरधारा झाल्या, पण त्या   साधारण २१ जुलैपर्यंतच असतील. त्यानंतर हा जोरओसरून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर मुंबईतही अशीच परिस्थितीचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.  रविवारी उत्तर अरबी समुद्रात, महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्यावर व पूर्वमध्य अरबी समुद्रावर ताशी ४५-५५ किमी वेगाने वारे वाहतील. तसेच ६५ किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे.

Story img Loader