शाळेतील सवंगड्यांसोबत केलेली मौजमस्ती, कधी शिक्षकांनी केलेले कौतुक, तर कधी पाठीवर मिळालेला धम्मकलाडू, सवंगड्यांच्या खोड्या काढल्यामुळे पडलेला ओरडा, परीक्षेच्या काळात अवघड वाटलेली प्रश्नपत्रिका, तर उत्तम गुण मिळाल्यानंतर भांड्यात पडलेला जीव… अशा अनेक जुन्या आठवणींना उजाळा देत गिरगावमधील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलमधून १९७१ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन रंगले.
तब्बल ५२ वर्षांनी ही सवंगडी मंडळी एकत्र जमली. कुणी मुंबईतच, कुणी मुंबई बाहेर, तर कुणी चक्क परदेशात वास्तव्यास आहेत. शालेय, महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निरनिरळ्या व्यवसायात, नोकरीत रमलेल्या या मित्र-मैत्रिणीनींनी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र भेटण्याचा निर्णय घेतला आणि मानसी कीर्तिकर, मोहन बेडेकर, विश्वास पेंडसे आणि प्रकाश पिंपुटकर कामाला लागले. तब्बल ५२ वर्षांपूर्वी एकाच वर्गात शिक्षण घेतलेल्या मित्र-मैत्रिणींचा शोध सुरू झाला. जमेल तेवढ्या विद्यार्थ्यांनी भेटायचे असा पक्का निर्धार करून अनेकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला. काही मंडळी विदेशात होती. त्यांना स्नेहसंमेलनासाठी मुंबईत येणे शक्य नव्हते. त्यामुळे चित्रफितीच्या रुपात त्यांना स्नेहसंमेलनात सहभागी करून घ्यायचे असा बेत ठरला.
अखेर शनिवार, ७ जानेवारीचा दिवस उगवला आणि चिकित्सक शाळेतील १९७१ च्या तुकडीतील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मरिन ड्राईव्ह समुद्रकिनाऱ्यावरील पोलीस जिमखाना गाठला. हळूहळू सवंगडी येत होते. तब्बल ५२ वर्षांनी भेट होत होती. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि स्नेहसंमेलनात रंगत येऊ लागली. माजी विद्यार्थ्यांसोबतच राजन मानकामे सर नामदेव जोशी सर, उषा केळकर – नेरूळकर आणि सामंत बाई आदी शिक्षक मंडळीही समारंभास आवर्जून उपस्थित होती. लाडक्या शिक्षकांना पाहुन उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. समारंभ ऐन रंगात आला असतानाच चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलचे माजी विद्यार्थी अशोक हांडे हेही माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोलीस जिमखान्यातील सभागृहात दाखल झाले.
हेही वाचा >>> मालाडमधील १०० वर्षे जुनी इमारत काळाच्या पडद्याआड..
या स्नेहसंमेलनात रंगत आली ती माजी विद्यार्थी – विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जुन्या गाळ्यांमुळे स्वर, ताल,, गाणी अशी खुसखुशीत मैफिल रंगली. या कार्यक्रमाच्या निवेदनाची धूरा माजी विद्यार्थ्यिनी मानसी कीर्तिकर यांनी सांभाळली. श्रीराम सोमासे यांनी तबल्यावर तर कल्पेश मिस्त्री यांनी सूरपेटीने उत्तम साथ देत कार्यक्रमात रंगत आणली. ‘रिमझिम गिरे सावन’, ‘मानसीचा चित्रकार तो’, ‘मी मनात हसता प्रीत हसे’, ‘खेड्यामधले घर कौलारू’, ‘मेरे दिल में’ आज आदी गाण्यांनी सभागृहातील वातावरण संगीतमय झाले होते. सरतेशेवटी विठुरायाच्या नामघोषात पाणावलेल्या डोळ्यांनी सोहळ्याची सांगता झाली. अखेर पुढील वाटचालीसाठी एकमेकांना शुभेच्छा देत पुन्हा लवकरच अशा एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्धार करीत जड अंतकरणाने एकेक माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी सभागृहाबाहेर पडले.