मुंबई : राज्यातील ८७ हजार कर्मचाऱ्यांना कमी वेतन देणे चुकीचे आहे. एसटी कर्मचारी ऊन, पाऊस, थंडीत प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यांचे वेतन ३० ते ५० हजारांच्या घरात आहे. यात ४४ टक्के कपात करून त्यांच्या वेतनावर डल्ला मारणे योग्य नाही. मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. वित्त विभागाच्या मानगुटीवर बसून कर्मचाऱ्यांचा वेतन देण्यास भाग पाडेन, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रलंबित वेतन मंगळवारी दिले जाणार आहे.
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाला यंदा मागणीच्या तुलनेत अर्धा निधी दिला गेला. एसटीतील ८७ हजार कर्मचाऱ्यांना वेतन व एलआयसीसाठी महिन्याला ४६६ कोटी रुपये लागतात. शासनाने केवळ ३०५ कोटी २९ लाख रुपये दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनात ५६ टक्के कपात करण्यात आली. दिवसरात्र राज्यातील एसटी प्रवाशांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये या कपातीमुळे संतापाची लाट पसरली. एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिलमध्ये फक्त ५६ टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
सांगोला तालुक्याच्या (जि. सोलापूर) दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकर देण्याची मागणी केली होती. या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे उर्वरित ४४ टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.