मुंबई : बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील ३,८९४ घरांच्या सोडतीतील १६२ विजेत्यांना नुकताच घरांचा ताबा देण्यात आला. आता उर्वरीत सर्व विजेत्यांना १५ ऑगस्टपर्यंत घराचा ताबा दिला जाईल अशी माहिती गिरणी कामगार सहनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांनी दिली. गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न २२ वर्षे प्रलंबित असून हा प्रश्न मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी रविवारी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शारदा मंगल कार्यालय येथे एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न गंभीर असून दीड लाख कामगार आजही घरापासून दूर आहेत. या दीड लाख कामगारांना घरे देण्यासाठी अजूनपर्यंत कोणतेही धोरण राज्य सरकारकडून आखण्यात आलेले नाही. त्यामुळे कामगारांची मुख्य मागणी ही दीड लाख कामगारांना घरे देण्यासाठी धोरण जाहीर करण्याची आहे. ज्या घरांसाठी सोडत निघाली आहे त्या सोडतीतील विजेत्यांना ताबा देण्यास अनेक कारणांनी विलंब होत आहे. असे अनेक प्रश्न गिरणी कामगारांचे असून त्यावर चर्चा करण्यासाठी तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी काय करावे लागेल हे ठरविण्यासाठी रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राणे यांनी सर्व कामगारांना घरे देण्यासाठी प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. गिरणी कामगारांच्या घरांच्या २०२० मधील सोडतीतील ३५००हुन अधिक विजेत्यांना १५ ऑगस्टपर्यंत घरांचा ताबा दिला जाईल असे त्यांनी सांगितले.