शैलजा तिवले
करोनावरील उपचारात रेमडेसिवीर फारसे फायदेशीर औषध नसून मृत्युदर कमी करण्यात अपयशी असल्याचा निष्कर्ष संशोधनात्मक अभ्यासाच्या माध्यमातून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केला आहे. प्रत्यक्षात योग्य रुग्णाला, योग्य वेळी योग्य प्रमाणात हे औषध दिल्यास उपयुक्त ठरत असल्याची ठाम भूमिका राज्याच्या करोना कृती दलाने घेतली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने ३० देशांत रेमडेसिवीर, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, लोपिनावीर, रिटोनावीर या औषधांचा अभ्यास सहा महिने केला. मरणापासून वाचविण्यात किंवा रुग्णालयातील कालावधी कमी करण्यात ही औषधे बाद ठरली असून करोना उपचारात गुणकारी नसल्याचे दिसून आले आहे. तसेच इबोलावरील रेमडेसिवीर औषधामुळे उपचारात कोणताही फायदा होत नाही, याउलट २५५० डॉलर्स खर्च होत असल्याचे यात नमूद केले आहे.
रेमडेसिवीर औषधाबाबत कृती दलाच्या सदस्यांनी चर्चा केली. योग्य रुग्णावर, योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वापर केल्यास उपयुक्त असल्याचे आम्हाला आढळले आहे. तीन ते नऊ दिवसांमध्ये हे औषध दिल्यास नक्कीच फायदेशीर ठरते. त्यामुळे बाजारातून हे औषध माघारी घेऊ नये. ते उपलब्ध असावे, असे आम्ही राज्य सरकारला कळविले आहे. उपचार नियमावलीत याबाबत बदल करण्यात येणार असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हे औषध देण्याबाबत निर्णय घ्यावा, असे नमूद करण्यात येणार आहे, असे कृती दलाचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले.
अभ्यासातून मृत्युदर रोखण्यात रेमडेसिवीर फारसे उपयुक्त नसल्याचे दिसून आले असले, तरी कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नसण्याच्या स्थितीमध्ये केवळ मृत्युदर रोखण्याचा निकष ठेवता येत नाही. उपचारातील अन्य काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. जसे की ताप सातत्याने येत असल्यास कमी करणे, संसर्गाची तीव्रता कमी करणे यासाठी सध्या रेमडेसिवीरशिवाय अन्य कोणतेही औषध उपलब्ध नाही. तसेच यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेमडेसिवीरच्या वापराचे धोके असल्याचेही दिसलेले नाहीत. त्यामुळे सध्या तरी याचा वापर पूर्णपणे बंद करू नये असे सूचित केल्याचे करोना कृती दलाचे सदस्य आणि फोर्टिस रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.
रेमडेसिवीर आतापर्यंत ७०० हून अधिक रुग्णांवर वापरले आहे. याच्या योग्य वापरामुळे रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रावर जाण्याची शक्यता कमी होते, असे लीलावती रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. जलील पारकर यांनी सांगितले.
‘निर्णय डॉक्टरांवर सोपवा’
जागतिक आरोग्य संघटनेचा हा अंतरिम निष्कर्ष आहे. त्यामुळे ही चाचणी पूर्ण करण्याबाबत काय निर्णय घेतील आणि त्यानंतर निष्कर्षांमध्ये काय बदल आढळतील का याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. तोपर्यंत सामान्य नागरिकांनी या वैद्यकीय चाचण्यांवरून मत तयार करू नये. उपचाराबाबतचा योग्य निर्णय डॉक्टरांवर सोपवून त्यांच्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन डॉ. पंडित यांनी केले आहे.