मराठी साहित्य-साहित्यिक, ग्रंथप्रकाशक-विक्रेते आणि चोखंदळ साहित्यप्रेमी मंडळींमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या ‘ललित’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ‘ललित’च्या आठवणींचा पट उलगडला गेला. यात सहभागी झाले होते ‘ललित’ मासिकाचे लेखक, स्तंभलेखक, प्रकाशक, साहित्यप्रेमी..
दादर येथील कोहिनूर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या सोहोळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘ललित’ मासिकाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. तर ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांनी सांगितले की, त्या काळात वाङ्मयीन विषयक विविध मासिके असली तरी ग्रंथ व्यवहाराला वाहिलेले ‘ललित’हे एकमात्र मासिक होते. ‘ललित’चे संस्थापक-संपादक केशवराव कोठावळे यांना बदलत्या काळाचे भान होते. ‘ललित’ काळानुरूप बदलत गेला आणि त्यामुळेच टिकून राहिला. ज्येष्ठ समिक्षिका डॉ. विजया राजाध्यक्ष म्हणाल्या, प्रत्येक लेखकाला आपले लेखन ‘ललित’मध्ये प्रसिद्ध व्हावे, असे वाटते हेच त्याचे यश आहे. ‘ललित’चे विद्यमान संपादक अशोक कोठावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ‘ललित’च्या पहिल्या अंकापासून अंकाचे मुखपृष्ठ करणारे चित्रकार वसंत सरवटे यांनी आजवर काढलेल्या मुखपृष्ठांच्या चित्रांचे प्रदर्शन येथे भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार सुभाष अवचट यांच्या हस्ते झाले.
‘ललित’ मासिकामधील ‘निर्मितीरंग’, ‘टप्पू सुलतानी’, ‘आनंदी आनंद’, ‘साहित्यिक गप्पा दहा साहित्यिकांशी’ आणि ‘शब्दगान’ या सदरांच्या पुस्तकांचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. जयवंत दळवी उर्फ ‘ठणठणपाळ’ आणि ‘ललित’ यांचे अतूट असे नाते होते, त्याच्याही आठवणी या वेळी जागविण्यात आल्या. ‘ललित’ मासिकाचे लेखक आणि परिवारातील मंडळींचा या वेळी भेटवस्तू आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यात मधु मंगेश कर्णिक, वसंत सरवटे, ‘ललित’च्या सहसंपादिका शुभांगी पांगे, चित्रकार सतीश भावसार, अक्षरलेखनकार कमल शेडगे यांच्यासह अन्य लेखकांचा समावेश होता.
‘ललित’च्या आठवणींना उजाळा!
मराठी साहित्य-साहित्यिक, ग्रंथप्रकाशक-विक्रेते आणि चोखंदळ साहित्यप्रेमी मंडळींमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या ‘ललित’ मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ‘ललित’च्या आठवणींचा पट उलगडला गेला.
First published on: 23-04-2013 at 04:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rememberance of lalit