१ सप्टेंबरपयर्यंत प्रमाणपत्र सादर न केल्यास बांधकाम व्यवसायात काम करता येणार नाही
मुंबई : बांधकाम व्यवसायात घर खरेदी – विक्रीचे व्यवहार करणाऱ्या जुन्या-नव्या नोंदणीकृत दलालांना आता महारेराचे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. जुन्या नोंदणीकृत दलालांना प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महारेराने विकासक आणि सुमारे ३९ हजार नोंदणीकृत दलालांना स्मरणपत्र पाठवून १ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन केले आहे. या मुदतीत हे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या संबंधितांना नोंदणीकृत दलाल म्हणून काम करता येणार नाही, असा इशाराही या स्मरणपत्राद्वारे देण्यात आला आहे.
घर खरेदी-विक्री व्यवहारातील ग्राहक आणि विकासक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून दलालांना ओळखले जाते. मात्र दलाल म्हणून काम करण्यासाठी कोणतेही शिक्षण, प्रशिक्षण नाही. कोणीही दलाल म्हणून काम करू शकतो. अशावेळी दलालांकडून मोठ्या ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशी अनेक प्रकरणे उघड झाली आहेत. या पार्श्वभूमीवर रेरा कायद्यात दलालांनाही रेरा नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. आता महारेराने दलालांना प्रशिक्षण आणि त्याअनुषंगाने प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. यासाठी महारेराने अखिल भारतीय स्थानिक स्वयं प्रशासन संस्थेच्या माध्यमातून अभ्यासक्रम तयार केला आहे. या अभ्यासक्रमाच्या आधारवर प्रशिक्षण देऊन दलालांची परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेत यशस्वी झालेल्या दलालांना प्रमाणपत्र देण्यात येते आणि हे प्रमाणपत्र असलेल्यांनाच दलाल म्हणून काम करण्याची मुभा आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर दलालांना काम करता येणार नाही. विना प्रमाणपत्र वा नोंदणी न करता दलाल म्हणून काम केल्याचे आढळल्यास त्यांच्याविरोधात रेरा कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
या निर्णयानुसार नवीन दलालांना १ मेपासून प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाची पहिली परीक्षा नुकतीच झाली असून त्याचा निकालीही जाहीर झाला. आता या परीक्षा पुढे सुरुच राहणार आहे. दरम्यान, जुन्या सुमारे ३९ हजार दलालांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी १ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. १ सप्टेंबरची तारीख जवळ येत असतानाही आतापर्यंत केवळ २,१३४ जणांनीच प्रशिक्षणासाठी नावनोंदणी केली असून यातील ४२३ जणांनी परीक्षा दिली आहे. यातील ४०५ जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे उर्वरित जवळपास ३८ हजारांहून अधिक दलाल प्रशिक्षण कधी पूर्ण करणार आणि प्रमाणपत्र कधी सादर करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता महारेराने सर्व विकासक आणि नोंदणीकृत दलालांना स्मरणपत्र पाठविले आहे. हे प्रमाणपत्र १ सप्टेंबरपर्यंत सादर करायचे असल्याची आठवण याद्वारे करण्यात आली आहे. तसेच हे प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाही तर दलाल म्हणून काम करता येणार नाही, असा इशाराही या स्मरणपत्राद्वारे देण्यात आला आहे.