शिवाजीपार्कचे नामांतर ‘शिवतीर्थ’ करा, अशी ताठर मागणी करणाऱ्या शिवसेनेने आता या मुद्दय़ावरूनही पुरती माघार घेतली आहे. ‘शिवाजी पार्कला नाही तर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या शक्तिस्थळाला शिवतीर्थ नाव द्या’, असा प्रस्ताव शिवसेना आणणार आसल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितले.
४ डिसेंबरला राहुल शेवाळे यांनी महापौर सुनील प्रभू यांना लिहिलेल्या पत्राद्वारे शिवाजीपार्कचे नामांतर करून शिवतीर्थ करावे, अशी मागणी केली होती. परंतु या मागणीला सगळीकडूनच विरोध होत असल्याचे लक्षात येताच राहुल शेवाळे यांनी आता माघारीचा पवित्रा घेतला आहे. एवढेच नव्हे तर आपण अशी काही मागणीच केली नसल्याचे राहुल शेवाळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या शक्तिस्थळाला शिवतीर्थ नाव द्या अशा स्वरूपाचा प्रस्ताव पालिकेच्या आगामी सभागृहात शिवसेना आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक शिवाजी पार्कवरच उभारण्याच्या मागणीपाठोपाठ शिवाजी पार्कच्या नामांतराच्या मुद्दय़ावरूनही आता शिवसेनेने माघार घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

Story img Loader