मुंबई : ज्येष्ठ बासरीवादक पंडित रोणू मजुमदार यांनी मध्य प्रदेशातील ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यावर ५४६ संगीतकारांना घेऊन अभूतपूर्व असा भारतीय शास्त्रीय संगीताचा आविष्कार सादर करीत विश्वविक्रम केला. त्यांच्या या सादरीकरणाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’च्या विशेष समारंभात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड समितीतील निशाल बारोट आणि रिचर्ड स्टेनिंग यांच्या हस्ते पंडित रोणू मजुमदार यांना विश्वविक्रमाचे प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
हेही वाचा >>> जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
‘माझ्या ‘समवेत’ या रचनेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचा आनंद आहे. ५४६ संगीतकारांच्या ‘सर्वात मोठ्या भारतीय शास्त्रीय बँड’चा संगीतकार व संचालक असल्याचा मला अभिमान आहे. हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण आहे. ‘समवेत’ ही रचना मियाँ मल्हार, मियाँ गिटोडी आणि दरबारी या तीन रागांवर आधारित होती. माझ्यामागे नेहमी खंबीरपणे उभे राहून मला प्रोत्साहित करणाऱ्या माझे सर्व चाहते आणि प्रेक्षकांचाही मी आभारी आहे’, असे पंडित रोणू मजुमदार यांनी सांगितले. तसेच, त्यांनी मध्य प्रदेश शासनाचा सांस्कृतिक विभाग तसेच मुख्यमंत्री मोहन यादव आणि केंद्र सरकारचे आभारही मानले. पंडित रोणू मजुमदार यांची सांगीतिक कारकीर्द त्यांचे वडील डॉ. भानू मजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. त्यानंतर पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले आणि पंडित विजय राघव राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारकीर्द बहरत राहिली.
हेही वाचा >>> बनावट नोटा छापणारी टोळी गजाआड
मैहर घराण्याशी असलेल्या त्यांच्या घट्ट नात्यामुळे ते लहानपणीच बासरी वाजविण्यात तरबेज झाले आणि त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. तसेच त्यांनी ‘अ ट्रॅव्हलर्स टेल’, ‘कोई अकेला कहाँ’ या यशस्वी आल्बमसह ‘प्रायमरी कलर्स’ या हॉलीवूड चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनाचे काम केले आहे. पंडित रविशंकर, जॉर्ज हॅरिसन, आणि गिटारिस्ट राय कूडर यांच्यासोबत त्यांनी जागतिक स्तरावर विविध संगीत कार्यक्रम केले. त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीत ‘हार्ट टू हार्ट’, ‘रेव्हरी’, ‘जुगलबंदी सीरिज’, ‘मेडिटेशन इन वृंदावन’, ‘साँग ऑफ नेचर’, तसेच ‘फॅसिनोमा’, ‘इन सर्च ऑफ लाइफ’, ‘एथिरिअल रिदम्स’, आणि ‘मिस्टिसिझम ऑन वुड विंड’ यांसारख्या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय आल्बमचा समावेश आहे. संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार, आदित्य विक्रम बिर्ला पुरस्कार आणि सहारा इंडिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.