मुंबई : सर्वसमावेशक समाजाचे स्वप्न उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र अथकपणे काम करणाऱ्या सेवाव्रतींना आर्थिक पाठबळ देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या दानयज्ञात दरवर्षीप्रमाणे यंदाही दात्यांनी भरभरून दान दिले. विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्थांचे हात बळकट करण्यासाठी वाचक-देणगीदार पुढे सरसावले आणि मदतीच्या धनादेशांचा ओघ यंदाही पाहायला मिळाला. या दानयज्ञाचा सांगता सोहळा सोमवार, २९ जानेवारी रोजी ठाणे (पश्चिम) परिसरातील घंटाळी येथील सहयोग मंदिर सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे. प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते  ‘देण्यातले घेणे’ या विषयावर उपस्थितांशी संवादही साधणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या १० संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’ने ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात करून दिला होता. त्यानंतर मदतीसाठी हजारो हात पुढे आले आणि वाचक-देणगीदारांनी समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या संस्थांच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले आहे. या वर्षी ‘दृष्टी आर्चरी अकॅडमी’, ‘नंददीप फाऊंडेशन, यवतमाळ’, ‘आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन’, ‘मनाली बहुउद्देशीय सेवा संस्था’, ‘पाठबळ सामाजिक विकास संस्था’, ‘तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था’, ‘आरोहन’, ‘पेटॅनिटी अ‍ॅन्ड अ‍ॅनिमल रिहॅबिलिटेटर्स फाऊंडेशन, चंद्रपूर’, ‘त्रिवेणी समाज विकास केंद्र’ आणि ‘गुरुजी एज्युकेशन फाऊंडेशन’ या संस्थांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला होता.

हेही वाचा >>>इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष देवधर यांचे निधन; ‘अ‍ॅप्लॅब इंडिया’चे संस्थापकप्रवर्तक

विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्थांची वाचकांना ओळख करून देत त्या संस्थांच्या कार्यासाठी दानयज्ञ खुला करून देणारा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा ‘लोकसत्ता’च्या विविध लोकोपयोगी उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठा प्रतिसाद देत दानशूरांनी संस्थांचे हात बळकट केले आहेत. ‘दि कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड’च्या सहकार्याने सुरू केलेल्या ऑनलाइन देणगीच्या सुविधेलाही दानशूरांनी मोठा प्रतिसाद दिला. या दानयज्ञाची सांगता आज डॉ. नाडकर्णी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी संस्थांचे प्रतिनिधीही संवाद साधणार आहेत.

’बँकिंग पार्टनर: दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि.

’कधी? सोमवार, २९ जानेवारी, सायंकाळी ६.०० वा.

’कुठे? सहयोग मंदिर सभागृह, दुसरा मजला, घंटाळी, ठाणे (पश्चिम)

(डॉ. आनंद नाडकर्णी)

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renowned psychiatrist dr anand nadkarni as chief guest at lok satta sarvakaryeshu sarvada programme amy