मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेलमधील खोल्यांचे भाडे सध्या १५ ते २५ हजारांच्या दरम्यान आहे. एवढा खर्च करणार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपने बाहेरगावच्या आपल्या आमदारांची सारी व्यवस्था ही कुलाबा परिसरातील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पुत्राच्या शाही विवाहाची लगबग मुंबईत सध्या सुरू आहे. देशविदेशातून अनेक जण दाखल होत आहेत. साहजिकच मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाजपच्या आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या प्रेसिडेंट हॉटेलमधील एका खोलीचे किमान भाडे हे १५ हजार रुपये आहे.

हेही वाचा >>> सत्ताधाऱ्यांचाच गदारोळ; आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळाचे कामकाज ठप्प

शिवसेना शिंदे गटाने आपल्या आमदारांची व्यवस्था वांद्रे येथील ‘ताज लॅण्डस एंड’ या हॉटेलात ठेवली आहे. अंबानी पुत्राचा विवाह वांद्रे-कुर्ला संकुलात असल्याने विमानतळ परिसर तसेच वांद्रे परिसरातील सर्व पंचतारांकित हॉटेलच्या दरात वाढ झाली आहे. ‘ताज लॅण्डस एंड’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये १५ ते २५ हजारांच्या दरम्यान भाडे आहे. या हॉटेलमध्ये शुक्रवार व शनिवारचे दर ते ३० हजारांपेक्षा अधिक आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना परळच्या ‘आटीसी ग्रॅण्ड’मध्ये ठेवण्यात येणार असून तेथील भाडे हे १२ ते १५ हजारांच्या दरम्यान एका सूटचे भाडे आहे.

खर्च कोण करणार?

राजकीय पक्ष कधीच स्वत:च्या नावे खोल्या आरक्षित करीत नाहीत. राजकीय वजन वापरून या खोल्या मिळविल्या जातात किंवा त्याचे भाडे अन्य कोणीतरी भरतो हे नेहमी अनुभवास येते.

उपराष्ट्रपती व मोदींचा अधिकृतमुंबई दौरा

मुकेश अंबानी यांच्या पुत्राच्या विवाहाला देशविदेशातील सत्ताधीश हजेरी लावणार आहेत. नेमके याच दरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शासकीय कार्यक्रम मुंबईत होणार आहेत. धनखड यांचा दौरा गुरुवार व शुक्रवार असा दोन दिवसांचा असून, गुरुवारी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात आमदारांसमोर त्यांचे भाषण होणार आहे. हे भाषण पूर्वनियोजित नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी मुंबईतील विविध पायाभूत सुविधांचे लोकार्पण किंवा भूमिपूजन करण्यात येणार आहे. याशिवाय वांद्रे-कुर्ला संकुलात त्यांचे भाषणही होणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rent of rooms in the five star hotel where mlas staying is currently between 15000 and 25000 zws