मंगल हनवते
मुंबई : वांद्रे पूर्व येथील ‘म्हाडा’ भवनाच्या दुरुस्तीसाठी मुंबई मंडळाने सादर केलेला प्रस्ताव राज्य सरकारने नामंजूर केला. लवकरच भवनाचा पुनर्विकास करण्यात येणार असताना दुरुस्तीवर का खर्च करायचा असा प्रश्न राज्य सरकारने उपस्थित केला आहे. त्याचवेळी मुंबई महापालिका अथवा आयआयटीसारख्या तज्ज्ञ संस्थेच्या माध्यमातून या वास्तूची संरचनात्मक तपासणी करून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
‘म्हाडा’ भवनाची इमारत जुनी झाली असून गेली अनेक वर्षे अधूनमधून भवनाची दुरुस्ती करण्यात येत आहे. आता म्हाडा भवन दुरुस्तीच्यापलिकडे गेले आहे. त्यामुळे ‘म्हाडा’ प्राधिकरणाने भवनाचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. मुंबई मंडळाच्या माध्यमातून भवनाचा पुनर्विकास करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
पुनर्विकास करताना सध्याच्या इमारती न पाडता मोकळय़ा जागेत नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी पाच वर्षे लागण्याची शक्यता असल्यामुळे सध्या इमारतीतील दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई मंडळाने दुरुस्तीसाठी सुमारे १५ ते २० कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी सरकारकडे पाठविला होता. या प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर निविदा काढून दुरुस्ती करण्यात येणार होती. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आल्याची माहिती म्हाडातील सूत्रांनी दिली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. पुनर्विकास हाती घेण्यात आला असताना दुरुस्ती कशासाठी करायची, असा प्रश्न उपस्थित करून संरचनात्मक तपासणी करण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. संरचनात्मक तपासणीअंती दुरुस्तीची गरज भासल्यास योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही सरकारने मुंबई मंडळाला कळविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता लवकरच म्हाडा भवनाची संरचनात्मक तपासणी करण्यात येण्याची शक्यता आहे.
याविषयी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बैठकीत असल्याने त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही. गृहनिर्माण विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर यांना विचारले असता त्यांनी यासंबंधीची माहिती घेऊन प्रतिक्रिया देऊ असे सांगितले.
पाच वर्षे कशी काढायची?
पुनर्विकास होईपर्यंत म्हाडा भवनातूनच कारभार चालणार आहे. पुनर्विकास होईपर्यंत दुरुस्तीशिवाय भवनात पाच वर्षे कशी काढायची असा सवाल म्हाडा कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा