म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून फेरनिविदा जारी

मुंबई : पनवेलमधील कोन परिसरातील गिरणी कामगारांच्या २,४१७ घरांची दुरुस्ती पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. कोनमधील ११ इमारतींच्या दुरुस्तीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा मागविल्या होत्या. मात्र यापैकी ८ इमारतींच्या निविदेला प्रतिसादच मिळालेला नाही. त्यामुळे आता आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी मंडळाने पुन्हा निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यास वेळ लागणार आहे. परिणामी विजेत्या गिरणी कामगारांची हक्काच्या घराची प्रतीक्षा लांबण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) भाडेतत्त्वावरील गृहप्रकल्पातील पनवेलमधील कोन येथील २,४१७ घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे विजेत्या कामगारांना घरांचा ताबा मिळालेला नाही. आता ताबा देण्याच्या प्रक्रियेतील सर्व अथडळे दूर करून मंडळाने घरांच्या दुरुस्तीसाठी निविदा मागविल्या होत्या. माक्ष या निविदेलाच प्रतिसाद मिळालेला नाही. मंडळाने ११ इमारतींसाठी स्वतंत्र ११ निविदा मागविल्या होत्या. यापैकी केवळ तीन इमारतींच्या दुरुस्तीच्या निविदेला प्रतिसाद मिळाल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर आता आठ इमारतींच्या दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भाजपाबरोबर जाण्यासाठी दबाव असल्याने शरद पवारांनी निवृत्ती घेतली? जयंत पाटील म्हणाले…

आता १३ मेपर्यंत निविदा सादर करण्याची अंतिम तारीख असून तांत्रिक निविदा १५ मे रोजी आणि आर्थिक निविदा १७ मे रोजी उघडण्यात येणार आहेत. या निविदेला कसा प्रतिसाद मिळतो यावर आता दुरुस्ती आणि घरांच्या ताब्याचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान, मुंबई मंडळाने निविदा प्रक्रिया पूर्ण करून मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याअखेरीस दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे नियोजन केले होते. मात्र आता काम सुरू होण्यासाठी किमान महिन्याभराचा विलंब लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Repair of mill workers houses in kon area in panvel delayed again mumbai print news amy