मुंबई : विक्रोळी पश्चिमेकडील एल. बी. एस. मार्गावर शनिवारी सकाळपासून सुरू झालेली पाणी गळती थांबवण्यात मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेला रविवारी पहाटे यश आले. ३०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या टोकावरील झाकण तुटल्याने ही गळती होत होती.मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीमधील विक्रोळी परिसरातील एल. बी. एस. मार्गावरील २४ इंचाच्या मुख्य जलवाहिनीतून शनिवारी सकाळी गळती होऊ लागली होती. त्यामुळे या रस्त्यावर पाणी साचले होते. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सहायक अभियंता (देखभाल) पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पथकाने रात्रभर दुरुस्तीचे काम केले.
तब्बल १५ तासानंतर पहाटे साडेपाच वाजता गळती रोखण्यात पथकाला यश आले. या गळतीमुळे विक्रोळी (पश्चिम) वाहिनी तात्पुरती बंद करावी लागली होती. ६००मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर पाण्याची गळती होत आहे, असे सुरुवातीला वाटत होते. मात्र खोदकाम करून पाहिले असता प्रत्यक्षात ३०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीच्या टोकावरील झाकण तुटल्याचे आढळून आले. दुरुस्ती कालावधीत ऐन सणाच्या दिवसात ‘एस’ आणि ‘एन’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील एल. बी. एस. मार्गालगतच्या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.