वारंवार होणाऱ्या बदलीचा परिणाम माझ्या कुटुंबीयावर होतो. त्यांच्यामध्ये नकारत्मकता वाढण्याची शक्यता असते. भविष्यामध्ये माझ्या बदलीचा परिणाम मुलांवर होणार नाही याची काळजी घेईल, अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी ११ व्या बदलीनंतर दिली आहे. तुकाराम मुंढे यांची आज पुन्हा एकदा बदली झाली आहे. १२ वर्षाच्या कार्यकाळात मुंढे यांची ११ व्यांदा बदली झाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना तुकाराम मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘पुर्णवेळ कार्यकाळ मिळत नसल्यामुळे वाईट वाटते. वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे कुटुंबावर नकारात्मक परिणाम होतो. मुलांना सतत शाळा बदलाव्या लागतात. त्यांमुळे त्यांना एका ठिकाणी स्थिरावता येत नाही. प्रत्येक जागेवर त्यांना नवीन मैत्री करावी लागते. भविष्यात मुलांना स्थिर आयुष्य देण्याचा प्रयत्न करेल. माझ्या बदलीचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घेईल, असे तुकाराम मुंढे म्हणाले.’

आणखी वाचा : तुकाराम मुंढेंची आता मंत्रालयात बदली

नाशिकमध्ये नऊ महिन्याच्या कालावधीत अनेक नवीन कामे केली. त्याचा येथील युवकांना भविष्यात नक्कीच फायदा होईल. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ऑनलाइन सेवा सुरू केली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्वच्छतेचा प्रकल्पही अखेरच्या टप्यात आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यामांतून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भविष्यात नाशिकमधील आर्थिक स्थिती सुधारेलेली असेल. भविष्यात येथील युवकांना कामासाठी इतर शहरात  जायची गरज भासणार नाही, असा विश्वास यावेळी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा : मुंढेंच्या बदलीविरोधात नागरिक रस्त्यावर, तर फटाके फोडून भाजपाचा आनंदोत्सव

नाशिक शहराच्या दृष्टीने महत्वाची अशी बस सेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची कागदपत्रे जमा केली आहेत. नाशिकमध्ये बस सेवा सुरू करण्याची इच्छा होती. पूर्णवेळ मिळाला असता तर नाशिकसाठी चांगले झाले असते. अपूर्ण कामे पूर्ण करता आली असती, अशी खंत मुंढे यांनी व्यक्त केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘नाशिकमधील कामावर मी खूश आहे. येथील लोकांनी मला भरभरून प्रेम दिले त्यामुळे काम करायला उत्साह मिळाला. नाशिककरांच्या पाठिंब्यामुळे मला काम करायला हुरूप आला.’

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन बदली झालेल्या तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे. नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच नाशिकचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. मुंढे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पालिका प्रशासनात चांगले बदल घडले होते. दरम्यान, नाशिकमधूनच मुंढेंच्या बदलीला विरोध होत आहे. अनेक नागरीकांनी आज मुंढेंच्या बदलीला विरोध करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

Story img Loader