मुंबई : मध्य रेल्वेच्या खारकोपर स्थानकानजीक २८ फेब्रुवारी रोजी लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले होते. मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने युद्धपातळीवर लोकलचे तीन डबे रुळावर आणून तब्बल ११ तासांनी लोकल सेवा पूर्ववत केली. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेचा अहवाल दोन – तीन आठवड्यांमध्ये सादर होण्याची शक्यता मध्य रेल्वेकडून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची विभागीय अधिकाऱ्यांऐवजी मुख्यालयांतील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
हेही वाचा >>> “संदीप देशपांडे कोण आहेत?” हल्ल्याबाबत पत्रकारांनी विचारताच संजय राऊतांची विचारणा; निषेध करत म्हणाले…
नेरूळ – खारकोपर आणि बेलापूर – खारकोपर हा रेल्वे मार्ग नोव्हेंबर २०१८ रोजी सेवेत दाखल झाला. या मार्गावर १२ डब्याच्या दोन लोकलच्या ४० फेऱ्या होतात. या मार्गावरून दररोज ३८ ते ४० हजार प्रवासी प्रवास करतात. फेब्रुवारी २८ रोजी सकाळी ८.४६ च्या सुमारास बेलापूर – खारकोपर मार्गावर खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले. या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी नसल्याने कोणालाही इजा झाली नाही, असा दावा मध्य रेल्वेने केला आहे. या दुर्घटनेनंतर तत्काळ रेल्वेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि लोकलचे डबे रूळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.
हेही वाचा >>> पुलांखाली वाहनतळाची सुविधा उपलब्ध करा; उच्च न्यायालयाची राज्य सरकारसह MMRDA मधील महापालिकांना नोटीस
या काळात बेलापूर – नेरूळ – खारकोपर लोकल सेवा बंद करण्यात आली होती. ही लोकल सेवा तब्बल ११ तासांनी सुरू करून नेरूळ स्थानकातून सायंकाळी ७.४२ वाजता खारकोपरसाठी पहिली लोकल सोडण्यात आली. मात्र, अद्याप या घटनेमागचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. प्राथमिक दुर्घटना अहवालासंबंधी कोणतीही माहिती उपलब्ध करण्यात आलेली नाही. येत्या दोन – तीन आठवड्यांत संपूर्ण घटनेचा उलगडा होईल, असा दावा मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.