प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘जहांगीर आर्ट गॅलरी’खेरीज अन्य कलादालनं बंद असतात – केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याचा एक उपक्रम असलेलं ‘राष्ट्रीय आधुनिक कलादालन’सुद्धा २६ जानेवारीला बंदच असतं. खासगी कलादालनं रविवारीसुद्धा बंद असतातच. पण एकदा का या साऱ्या वेळा पाळल्या, तर मुंबईत पाहण्यासारखी प्रदर्शनं भरपूर आहेत सध्या! अगदी लोअर परळच्या ‘इंडियाबुल्स वन सेंटर’मधल्या ‘गॅलरी ओडेसी’ या प्रचंड- परंतु अननुभवी गॅलरीत भरलेल्या ‘द गिफ्ट’ या प्रदर्शनापासून, ते कुलाबा बस स्थानकाच्याही आणखी पुढे असलेल्या ‘आर्ट म्यूसिंग्ज गॅलरी’पर्यंत- मधल्या जवळपास सर्व कलादालनांमध्ये प्रदर्शनं सुरू आहेत. २७, २८ तारखांना किंवा त्यापुढल्या आठवडय़ात ती पाहता येतीलच.. कुठल्याही गॅलरीत गेलं तरी गेल्या सहा-सात महिन्यांतून त्या गॅलरीतलं महत्त्वाचं प्रदर्शन ठरावं, असं प्रदर्शन आपल्यासाठी तयार आहे.. असा ‘प्रेक्षकसत्ताक’ माहौल सध्या मुंबईत आहे. पुण्यात ‘पुणे बिएनाले’ आता संपत आली असल्यानं (२९ जानेवारीला या पुणे द्वैवार्षिकीचं समापन आहे), तिथल्याही प्रेक्षकांनी या निमित्तानं मुंबईत यायला हरकत नाही!

कलाध्यापक, आजही गांभीर्यानं कलावंत म्हणून जगणाऱ्या अनेकांचे गुरू दिवंगत शंकर पळशीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या कलाकारकीर्दीचा आढावा घेणारं सिंहावलोकन ‘राष्ट्रीय आधुनिक कला दालना’त सुरू आहे. ‘जहांगीर’मध्ये सध्या ‘फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडिया’चं वार्षिक प्रदर्शन आणि विक्रांत मांजरेकर यांच्या शिल्पांचं प्रदर्शन लक्षणीय आहेत; तर जहांगीरच्या पायऱ्यांऐवजी ‘रॅम्प’वरनं चालत गेल्यास लगेच जी मॅक्समुल्लर भवनाची इमारत लागते तिथल्या तळमजल्याच्या गॅलरीत ‘डिझाइन थिंकिंग’ हा संकल्पन-कृतींचं प्रदर्शन आणि चर्चा असा उपक्रम सुरू आहे. त्याऐवजी दुसऱ्या बाजूनं शेजारच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया’त (पूर्वीचं ‘प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम’) गेलात, तर गांधीजींचे पुतणे कनु गांधी यांनी या महात्म्याचा साधेपणा टिपणारे जे दुर्मीळ फोटो काढले होते, त्यांच्या प्रदर्शनासह संग्रहालयातलं कुठलंही दालन ७० रुपये तिकिटात पाहता येईल. नरिमन पॉइंटला ‘आयनॉक्स’समोरच्या ‘बजाज भवना’तल्या कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये सुमारे अर्धशतकभर अध्यापन केलेल्या प्रा. डी. बी. बेळे सरांच्या कलाकृती निवास कान्हेरे यांच्या रंगचित्रांसह मांडलेल्या आहेत. या चारही गॅलऱ्या, खासगी मालकीच्या नसून ‘ना नफा’ तत्त्वावर चालणाऱ्या, सार्वजनिक आहेत.

मुंबईतल्या अनेक खासगी गॅलऱ्यांतही प्रेक्षकांना कधी दारावरली बेल दाबून, तर कधी तेवढंही न करता बेधडक मोफत जाता येतं.. प्रेक्षक म्हणून आपण नवखे आहोत, याचंही दडपण आपण बाळगू नये, अशीच या गॅलऱ्यांचीही अपेक्षा असते.. गेल्याच शनिवारी ‘मुंबई गॅलरी वीकएण्ड’च्या निमित्तानं वर्षांतून एकदाच का होईना, पण अनेक खासगी गॅलऱ्यांच्या संचालकांनी स्वत: अशा नवख्या प्रेक्षकांना प्रदर्शनांची माहिती देत, समोरच्या कलाकृतींची इंगितं सांगत फेरफटका मारून आणला! हा वॉकथ्रू उपक्रम नेहमी नसतो; पण प्रदर्शनाबद्दल माहिती विचारणारे योग्य प्रश्न केल्यास उत्तरं मिळतात. काळा घोडा भागातल्या ‘ज्यू सिनेगॉग’ समोरच असलेली ‘दिल्ली आर्ट गॅलरी’ ही मोठी गॅलरी तर, भिंतींवरल्या लेबलांमधून भरपूर माहिती देतेच; शिवाय एखादं स्वप्रकाशित जाडजूड पुस्तकही जिज्ञासूंसाठी जिथल्या तिथे वाचायला खुलं ठेवते- अर्थात बसायला कोचखुच्र्याही ठेवते.. सध्या या गॅलरीत महत्त्वाचे अमूर्तचित्रकार अंबादास (मूळचे अकोल्याचे, पुढे मुक्काम नॉर्वे, आता दिवंगत), जे. स्वामीनाथन, बडोद्याचे ज्योती भट्ट, जेराम पटेल, अशा ज्येष्ठ चित्रकारांचं प्रदर्शन भरलं आहे. आधुनिक भारतीय कलेचा जो इतिहास शिकवला जातो, त्यात अद्याप ही नावं आली नसली तरी नक्कीच येणार आहेत.

‘केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ ही खादी भांडाराच्या मागच्या ‘क्वीन्स मॅन्शन’ इमारतीत तिसऱ्या मजल्यावरली अशीच प्रशस्त गॅलरी, तिथं प्रामुख्यानं व्हिडीओ माध्यमात काम करणाऱ्या सोनिया खुराणा यांच्या कलाकृतींचं एकत्रित दर्शन घडतं. स्त्रीवाद, राजकीय जाणीव यांच्याही पलीकडे- मला जगण्याची लय आणि त्या लयीला होणारे अटकाव जाणवतात- असं सोनियानं एकदा ओघात सांगितलं होतं, त्या लय-अटकाव तत्त्वांच्या खरेपणाची साक्ष हे प्रदर्शन देईल. सोनिया यांच्या कलाकृतींमध्ये त्या स्वत:, त्यांचा देह, इतरांच्या दृष्टीनं त्यात असलेली वैगुण्यं, हा विषय केंद्रस्थानी आहे. सोनिया खुराणांइतकी अनुभवी नव्हे, पण स्वत:चे फोटो काढवून घेणारी आणि त्यातून प्रश्नांना भिडण्याचीही हिंमत दाखवू शकणारी गेल्या सात-आठ वर्षांत पुढे आलेली ‘प्रिन्सेस पी’ हिचं मुंबईतलं पहिलंच प्रदर्शन कुलाब्याच्या ‘साक्षी गॅलरी’त भरलं आहे. ‘साक्षी’समोरच्याच ‘लकीरें’ आर्ट गॅलरीतलं प्रदर्शन, हे संचालिका आर्शिया लोखंडवाला यांनी ‘इंडियाबुल्स वन सेंटर’मधल्या ‘गॅलरी ओडेसी’साठी विचारनियोजित केलेल्या ‘द गिफ्ट’ या प्रदर्शनाचा भाग वाटावं असं आहे. वरळीलाच नेहरू तारांगणानजीकच्या ‘ताओ आर्ट गॅलरी’मध्ये अरुणांशु चौधरी या बडोदावासी गुणी कलावंताचं प्रदर्शन सुरू आहे, तर कुलाब्यात ताजमहाल हॉटेलच्या मागच्या बाजूस ‘सनी चेंबर्स’मधल्या ‘गॅलरी मिरचंदानी-स्टाइनऱ्यूक’मध्ये विख्यात चित्रकार गीव्ह पटेल यांच्या गेल्या पाच वर्षांतील चित्रांचं प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनातल्या सुमारे १५ चित्रांपैकी जे चित्र इथं या मजकुरासोबत छापलं आहे, ते अपूर्ण आहे.. गीव्ह पटेल यांनी ‘आधी प्रेक्षकांना त्या चित्राचं हे फिक्या रंगांतलंही रूप पाहू द्या’ अशा विचारानं आवर्जून हे चित्र प्रदर्शित झालं असून, पुन्हा ते पटेल यांच्या स्टुडिओतच जाईल.

Story img Loader