मुंबई : उर्वरित काळ अध्ययन, मनन आणि चिंतनात व्यतीत करू इच्छितो. त्यामुळे आपल्याला राजकीय जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोश्यारी यांनी स्वत: प्रसिद्धिपत्रकाच्या माध्यमातून ही माहिती दिली.
कोश्यारी यांनी यापूर्वीही राज्यपालपद सोडण्याची इच्छा बोलून दाखविली होती. मात्र यावेळी त्यांनी थेट पंतप्रधानांनाच विनंती केली आहे. गेल्या आठवडय़ात पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यात आपण याबाबत बोलल्याचे कोश्यारी यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. ‘पंतप्रधान मोदी यांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि मला आशा आहे की यापुढेही मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहील’, असे मनोगत कोश्यारी यांनी व्यक्त केले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात कोश्यारी यांनी तत्कालीन सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्यापासून त्यांनी कायमच विरोधी भूमिका घेतली. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री हा वाद कायमच रंगला. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी कोश्यारी यांनी सोडली नाही. वाद एवढा टोकाला गेला होता की, मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगी न दिल्याने सुमारे पाऊण तास थांबून राज्यपालांना सरकारी विमानातून खाली उरतावे लागले. सत्ताबदल झाल्यापासून कोश्यारी शांत होते. मात्र मध्यंतरी वादग्रस्त विधानांमुळे ते अडचणीत आले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह अनेक महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचीही कोंडी होत होती.
सभापतीपदासाठी खेळी
राज्यपाल नियुक्त १२ आमदार विधान परिषदेत आल्याशिवाय भाजप आणि शिंदे गटाला सभापतीपद मिळणे अशक्य आहे. महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या १२ जणांची नियुक्ती कोश्यारी यांनी टाळली. सत्ताबदलानंतर कोश्यारी यांनी नियुक्ती केली असती तर त्यातून वेगळा संदेश गेला असता. त्यामुळेच कोश्यारी यांना बदलून नवीन राज्यपालांमार्फत १२ जणांची नियुक्ती केली जाईल, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले आहे.
उपयुक्तता संपली?
कोश्यारी यांची उपयुक्तता भाजपसाठी संपली आहे आणि त्यामुळेच त्यांना लवकर राज्यपालपदावरून पदमुक्त केले जाईल, अशी चिन्हे आहेत. राजीनाम्याची इच्छा व्यक्त करून त्याला प्रसिद्धी देणे हा याच रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. प्रजासत्ताक दिनानंतर कोणत्याही क्षणी कोश्यारी यांच्या जागी दुसऱ्या राज्यपालांची नियुक्ती होऊ शकेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.