लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : महानगरपालिकेतर्फे छोट्या व मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी मागवलेल्या निविदांची छाननी पूर्ण झाली असून एकूण २३ कंत्राटदारांना नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले आहेत. येत्या मंगळवारपासून गाळ काढण्याच्या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, पालिकेने नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांसाठी कंत्राटदाराला छायाचित्रासह ३० सेकंदाचे चित्रीकरण बंधनकारक केले आहे. या चित्रीकरणाचे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे विश्लेषणही करण्यात येणार आहे. तसेच, केवळ दोन महिन्यात ८० टक्के नालेसफाई करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे.

कंत्राटदारांना लहान नाल्यांमधून गाळ उपसा करण्याचे कार्यादेश १९ मार्च, तर मोठ्या नाल्यांमधून गाळ काढण्याचे कार्यादेश २२ मार्च रोजी देण्यात आले आहेत. त्यानुसार, मुंबईत येत्या २५ मार्चपासून गाळ काढण्याची कामे सुरू होणार आहेत. दरम्यान, मिठी नदीतील गाळ काढण्याचे कार्यादेश येत्या आठवड्यात देण्यात येणार असून लागलीच गाळ काढण्याची कार्यवाही सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे. नाल्यांमधून गाळ काढण्याच्या कामांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता राहावी, तसेच कामावर योग्य प्रकारे देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने यंदा कंत्राटांमध्ये अधिक कठोर अटी व शर्तींचा समावेश केला आहे. त्या अंतर्गत कंत्राटदाराला नाल्यांमधून गाळ उपसा करण्यापूर्वी आणि गाळ उपसा केल्यानंतरची छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच, प्रत्येक कामासाठी ३० सेकंदांचे चित्रीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. लहान नाल्यांच्या बाबतीत गाळ काढण्यापूर्वीचे आणि गाळ काढल्यानंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरणही बंधनकारक आहे. कंत्राटदारांना लहान नाल्याच्या उगमापासून पातमुखापर्यंत चित्रीकरण करावे लागणार आहे. मोठ्या आणि लहान नाल्यांमधून गाळ उपसा केलेल्या कामांच्या या सर्व चित्रफिती कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर करून तपासण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दरवर्षी नाल्यांमध्ये साचणारा गाळ हा वर्षभरात तीन टप्प्यांमध्ये काढला जातो. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी सर्वाधिक गाळ उपसा केला जातो. त्यानुसार यंदा एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत नाल्यांमधील ८० टक्के गाळ काढण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. तसेच, पावसाळ्यादरम्यान १० टक्के आणि पावसाळ्यानंतर उर्वरित १० टक्के गाळ काढण्यात येणार आहे.

चित्रफित बंधनकारक

नालेसफाईचे काम सुरू होण्यापूर्वी, प्रत्यक्ष काम सुरू असताना आणि काम पूर्ण झाल्यानंतर दिनांक, वेळ, अक्षांश, रेखांश (रिअलटाइम जिओ-टॅग) यासह चित्रफीत आणि छायाचित्रे तयार करून ती संबंधित सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना अनिवार्य असेल. दररोज नाल्यांमधून काढलेला गाळ ठेवण्याची जागा, गाळ भरण्यापूर्वी रिकामा असलेला डंपर, डंपरमध्ये गाळ भरल्यानंतरचे दृश्य, गाळ भरलेले वाहन क्षेपणभूमीवर जाण्यापूर्वी वजन काट्यावर केलेल्या वजनाची कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय थेट सॉफ्टवेअरमध्ये होणारी नोंद, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर पोहोचलेल्या वाहनांची माहिती, त्या वाहनांचे क्रमांक आणि वेळ यांची नोंद करण्यात येईल. तसेच, क्षेपणभूमीवर ये – जा करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणाही उभारण्यात येणार आहे.

कार्यस्थळी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य

यंदा प्रथमच गाळ उपसासंदर्भातील चित्रीकरणाच्या तपासणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा प्रयोग करण्यात येणार आहे. त्यातून नाल्यांमधून गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. तसेच गाळ काढण्याच्या संपूर्ण कालावधीत प्रत्यक्ष कार्यस्थळी अभियंत्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.