मुंबई : गेल्या काही वर्षांत जुन्या चित्रपटांच्या पुन:प्रदर्शनाचा प्रकार चांगलाच रुळला आहे. चित्रपटगृहात एक – दोन आठवडे कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होणार नसेल वा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना प्रेक्षकच मिळत नसतील तर अशावेळी काही निर्माते जाणीवपूर्वक आपले चाललेले किंवा फारसे न चाललेले चित्रपट पुन्हा प्रदर्शित करतात. या आठवड्यातही अशाचप्रकारे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’, ‘रहना है तेरे दिल में’ आणि ‘कंतारा’ हा हिंदी डब असलेला दाक्षिणात्य चित्रपट आदी पुन्हा प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात ‘लैला मजनू’ हा २०१८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता, त्याचे शो दुसऱ्या आठवड्यातही सुरू आहेत.
अभिजात वा प्रसिद्ध चित्रपट प्रदर्शित होऊन काही ठरावीक वर्ष उलटल्यानंतर चित्रपटगृहातून पुन्हा प्रदर्शित केले जातात. नव्या पिढीला ते चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहता येतील आणि जुन्यांचे स्मृतीरंजन होईल या दोन्ही उद्देशाने असे जुने चित्रपट पुन:प्रदर्शित केले जातात. मात्र करोनानंतरच्या काळात नव्याने कुठलेच चित्रपट प्रदर्शित होत नव्हते, अशावेळी प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत आणण्याच्या उद्देशाने काही निवडक प्रसिद्ध चित्रपट नव्याने प्रदर्शित केले गेले. या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे हे लक्षात आल्यानंतर अशा पद्धतीने नवीन चित्रपट प्रदर्शित होणार नसतील त्यादरम्यान जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा पायंडाच पडला आहे.
हेही वाचा – क्रिकेट मंडळावरील ‘कृपादृष्टी’वर न्यायालयाचे ताशेरे
या महिन्यात ‘स्त्री २’, ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ असे तीन नवीन चित्रपट एकाच वेळी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाले होते, मात्र ‘स्त्री २’ वगळता अन्य दोन्ही चित्रपट पूर्णपणे अपयशी ठरले. तीन मोठे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाल्याने त्या पुढच्या दोन आठवड्यात कोणतेही नवीन मोठे हिंदी वा मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यात आले नाहीत. सध्या ‘स्त्री २’चेच शो तिसऱ्या आठवड्यातही सुरू असून त्यांना प्रतिसाद कमी झाला आहे. नवीन चित्रपटांअभावी चित्रपटगृह रिकामे ठेवण्यापेक्षा जुने चित्रपट प्रदर्शित केल्याने चित्रपटगृह व्यावसायिकांनाही दिलासा मिळतो आणि निर्मात्यांनाही पुन्हा आपले चित्रपट प्रदर्शित करून कमाईची संधी मिळते, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या आठवड्यात अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटाचे दोन्ही भाग, रिषभ शेट्टीचा ‘कांतारा’ आणि सैफ अली खान – आर. माधवन – दिया मिर्झा यांचा सुपरहिट चित्रपट ‘रहना है तेरे दिल मे’ हे तीन चित्रपट प्रदर्शित करण्यात आले आहेत. आपले जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याने चित्रपटातील कलाकारांनीही आनंद व्यक्त केला आहे.
दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ‘सबका बदला लेने आ गया तेरा फैजल’ असा चित्रपटातील गाजलेला संवाद इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राज्यात अकोल्यापासून मुंबईतील उपनगरांपर्यंत चित्रपट कुठे प्रदर्शित झाला आहे त्या चित्रपटगृहांची यादीच दिली आहे. या चित्रपटात दानिश खानची भूमिका करणाऱ्या अभिनेता विनीत कुमारनेही ‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या पुन:प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला असून या चित्रपटाची जादू पुन्हा पडद्यावर अनुभवणे हा अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे, अशी भावना व्यक्त केली.
हेही वाचा – मुंबई शिक्षक मतदारसंघातील निकालाला न्यायालयात आव्हान
‘लैला मजनू’ या साजिद अली दिग्दर्शित चित्रपटाने २०१८ साली ३ कोटींची कमाई केली होती. गेल्या आठवड्यात पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने ६ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहता भविष्यात आणखीही काही जुने चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात पाहण्याची संधी मिळणार आहे यात शंका नाही.