मुंबई : भिवंडी येथील एका कार्यालयात आढळलेल्या घोरपडीचा तिच्या अंड्यांसमवेत बचाव करण्यात आला असून सध्या घोरपडीवर वैद्याकीय उपचार सुरू आहेत. ही घोरपड कार्यालयात बरेच दिवस वावरत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
भिवंडीतील सोनवले येथील एका कार्यालयात घोरपड वावरत असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले होते. मात्र, तिचा शोध घेतल्यावर ती कुठेही आढळली नाही. त्यानंतर काही दिवसांनी घोरपड कार्यालयातील शौचालयात जाताना दिसली. कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहातील दार बाहेरून बंद केले. कार्यालयाला बचाव पथकाबाबत कोणतेही माहिती नसल्यामुळे संपूर्ण रात्रभर घोरपड शौचालयाच्या आतमध्येच बंद होती.
आणखी वाचा- याचिका दाखल करणे हा प्रकल्प रखडवण्याचा सोपा मार्ग, उच्च न्यायालयाची टिप्पणी
दुसऱ्या दिवशी सकाळी याबाबतची माहिती वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनला (डब्लूडब्लूए) देण्यात आली. बचाव पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर स्वच्छतागृहातन घोरपडीला बाहेर काढताना ती अंड्यांसह आढळली. तसेच बचावकार्यादरम्यान घोरपड बेशुद्ध अवस्थेत असल्याचे बचाव पथकाला समजताच तिच्यावर तात्काळ वैद्याकीय उपचार सुरू करण्यात आले. सध्या घोरपड वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशनच्या ताब्यात असून तिच्यावर वैद्याकीय उपचार सुरू आहेत.