मुंबई : कच्च्या तेलापासून गॅसोलीन किंवा डिझेलसारख्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून अर्ध प्रक्रिया केलेले पाणी सोडले जाते. यामध्ये नायट्रोजन संयुगांसह इतर जैविक व अजैविक अशा घातक प्रदूषकांचा समावेश असल्याने ते पर्यावरणासाठी घातक ठरतात. हे पाणी शुद्ध करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईतील (आयआयटी मुंबई) संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये अर्ध-प्रक्रियाकृत पाण्यामध्ये प्रदूषक नष्ट करू शकतील असे जीवाणू असल्याचे निदर्शनास आले आहे. या जीवणूंना जैवगाळक (बायोफिल्टर) म्हणून वाळूच्या थराचा आधार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तेल शुद्धीकरण कारखान्यांमधून अर्ध प्रक्रिया केलेले पाणी सोडले जाते. या टाकाऊ पाण्यामधील प्रदूषकांमुळे ते वातावरणासाठी घातक ठरते. अर्ध प्रक्रियायुक्त पाणी सुरक्षितपणे सोडता यावे यासाठी त्यातील घातक प्रदूषक घटक काढून टाकले जातात. हे पाणी अधिकाधिक शुद्ध करण्यासाठी आयआयटी मुंबईतील संशोधक संशोधन करीत आहेत. पाण्यातील प्रदूषक काढून टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जीवाणू व इतर सूक्ष्मजीवांना जैवगाळक म्हणतात. या जैवगाळकांच्या अभ्यासात करखान्यांतून सोडलेल्या अर्ध-प्रक्रियाकृत पाण्यामध्ये प्रदूषक नष्ट करू शकतील असे जीवाणू असल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले.
हेही वाचा >>>धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन धारावीकर उधळणार; उद्यापासून धारावीकरांचे साखळी उपोषण
संशोधकांनी ४५ सेंटीमीटर लांब व २ सेंटीमीटर व्यास असलेल्या ॲक्रीलिक सिलेंडरच्या जैवगाळकाची रचना केली. त्यामध्ये १५ सेंटीमीटर खोलीपर्यंत शुद्ध वाळू भरली. विषारी रसायने काढून टाकण्याची शुद्धीकरण प्रक्रिया झालेले तेल – शुद्धीकरण कारखान्यातील पाणी या जैवगाळकामधून १ ते १० मिलिलिटर प्रति मिनिट या गतीने सोडले. पाणी वाळूमधून वाहतांना पाण्यातील जीवाणू वाळूवर चिकटतात. जीवाणू हे एक्स्ट्रासेल्युलर पॉलिमेरिक पदार्थाचा स्त्राव बाहेर टाकतात. या स्त्रावाचे वाळूच्या कणांभोवती जैविक आवरण तयार होते. पाण्यात विरघळलेला प्राणवायू आणि पाण्यातील सेंद्रिय कार्बन व इतर पोषक घटकांवर हे जीवाणू जगतात. हे जैविक आवरण पाण्यातील प्रदूषक नष्ट करत असल्याचे आयआयटी मुंबईतील पर्यावरण शास्त्र व अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका सुपर्णा मुखर्जी यांनी सांगितले.
हेही वाचा >>>प्रसिद्ध चित्रकार एस.एच. रझा यांच्या चित्राची चोरी; अडीच कोटी रुपये किंमतीच्या चित्राच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
संशोधकांनी रासायनिक प्राणवायू मागणी, सेंद्रिय कार्बन आणि मिसळण्यायोग्य सेंद्रिय कार्बन यांचे विश्लेषण केले. यामध्ये त्यांना जैवगाळकांमधून पाणी दोनदा गाळल्यानंतर रासायनिक प्राणवायूची मागणी, सेंद्रिय कार्बन आणि मिसळण्यायोग्य सेंद्रिय कार्बन यामध्ये लक्षणीय घट झाली. पाण्यातील काही विशिष्ट संयुगे शोधण्यासाठी आणि त्यांचे मापन करण्यासाठी संशोधकांनी गॅस क्रोमॅटोग्राफी टाइम ऑफ फ्लाइट मास स्पेक्ट्रोमेट्री हे तंत्र वापरले. तेल शुद्धीकरणातील टाकाऊ पाणी १२ वेळा गाळण्यांमधून फिरवल्यानंतर रासायनिक प्राणवायूची मागणी व एकूण सेंद्रिय कार्बन यामध्ये सर्वाधिक म्हणजेच अनुक्रमे ६२ टक्के व ५५ टक्के घट झाल्याचे आढळले. १२ वेळा पाणी गाळल्यानंतर पाण्यातील घातक संयुगांपैकी काही संयुगे गॅस क्रोमॅटोग्राफी टाइम ऑफ फ्लाइट मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्राने पाहिल्यावर पाण्यात आढळली नाहीत, याचाच अर्थ ती संयुगे १०० टक्के नष्ट झाल्याचे आढळून आल्याचे या शोधनिबंधाचे सहलेखक आणि आयआयटी मुंबईचे माजी पीएचडी विद्यार्थी डॉ. प्रशांत सिन्हा यांनी सांगितले.
प्रोटीओबॅक्टिरिया समूहातील जीवाणूंचा समावेश
हे जीवाणू प्रोटीओबॅक्टिरिया समूहातील असून, या समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे यातील जीवाणू, सजीवांसाठी घातक असलेल्या पॉलीन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच) सारख्या संमिश्र सेंद्रिय संयुगांचे विघटन करू शकतात. प्रोटीओबॅक्टिरिया समूहामध्ये स्फिंगोमोनाडेल्स, बर्कहोल्डेरियल्स, रोडोबॅक्टेरेल्स आणि रोडोस्पायरिलेल्स यांसारख्या उपयुक्त जीवाणूंचा समावेश असून, हे जीवाणू घातक प्रदूषक नष्ट करतात.